बर्लिन : सहा वर्षांच्या कालावधीत 85 रुग्णांचे प्राण घेतल्याच्या आरोपातून रुग्णसेवकाला 15 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. जर्मनीच्या युद्धोत्तर कालावधीतील हा सर्वात मोठा नरसंहार मानला जात आहे.
रुग्णांची सेवासुश्रुषा करण्याची जबाबदारी नर्सवर असते. मात्र जर्मनीत नील्स होगल हा पुरुष नर्स सीरिअल किलर असल्याचं उघड झालं होतं. सध्या 42 वर्षांच्या असलेल्या नील्सने दोन दशकांपूर्वी हत्यांना सुरुवात केली होती. इंजेक्शन देऊन त्याने रुग्णालयातील असंख्य रुग्णांचे जीव घेतल्याचा आरोप आहे.
2000 ते 2005 या कालावधीत या हत्या घडल्या आहेत. ओल्डनबर्ग आणि डेल्मेनहॉर्स्टमधील रुग्णालयात त्याने रुग्णांची हत्या केली. आरोपीने कदाचित शंभरपेक्षा जास्त रुग्णांनाही मारलं असू शकतं, मात्र त्यापैकी अनेकांचं दफन झाल्यामुळे पुरावे नष्ट झाले आहेत, असं म्हटलं जात आहे.
एका रुग्णाला अनप्रिस्क्राईब्ड औषधं देताना नील्सला 2005 साली रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला 2008 साली सहा हत्यांप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा (सात वर्ष) सुनावली होती. जर्मन कायद्यानुसार हत्येच्या आरोपाखाली व्यक्तीला 15 वर्षांच्या कारावासानंतर पॅरोलची तरतूद आहे.
मरणपंथाला लागलेल्या रुग्णांना जीवदान देऊन सहकाऱ्यांवर प्रभाव पाडण्याचा त्याचा इरादा होता, असं म्हटलं जातं. त्यासाठी तो रुग्णांना मुद्दाम डोस देऊन मरणासन्न अवस्थेत टाकत असे. मात्र या नादात शेकडो रुग्णांना प्राण गमवावे लागले. हा आकडा दोनशेच्या घरात असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला होता.
सहा वर्षांत 85 रुग्णांचे प्राण घेणाऱ्या नर्सला 15 वर्षांचा तुरुंगवास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jun 2019 10:07 PM (IST)
2000 ते 2005 या कालावधीत आरोपी नील्स होगलने ओल्डनबर्ग आणि डेल्मेनहॉर्स्टमधील रुग्णालयात शेकडो रुग्णांची हत्या केल्याचं म्हटलं जातं. त्यापैकी 85 जणांच्या हत्यांचे आरोप सिद्ध झाले आहेत.
फोटो : गेट्टी इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -