मुंबई : आई ही आई असते. मग ती मनुष्याची असो वा प्राण्याची. जागतिक मातृत्व दिनाच्या तोंडावर गायीतलं मातृत्व अधोरेखित करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. संतापलेल्या गायीने आपल्या वासराला ठार मारणाऱ्या अॅनाकोंडाला पळता भुई थोडी केली. ब्राझीलमधली ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला गायीचं वासरु शेतात निपचित पडलेलं दिसतं. गायीच्या अंगात अक्षरशः वीज संचारलेली दिसते. लेकराच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या इर्षेतून अॅनाकोंडाला तिने सळो की पळो करुन सोडलं. शिंगं आणि लाथांनी तुडवून गाय अॅनाकोंडाला बेजार करण्याचा प्रयत्न करते.

प्रतिकार म्हणून अॅनाकोंडानं गायीचाही दोनदा चावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही गायीने आपला लढा सुरुच ठेवला. मध्येच अॅनाकोंडा वासराच्या मृतदेहाचा लचका तोडण्याचाही प्रयत्न करतो.

काही मिनिटं दोघांमध्ये झालेल्या झुंजीनंतर गाय आणि अॅनाकोंडा दोघेही निघून गेले. हे संपूर्ण दृश्यं तीन शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केलं. मात्र अशाप्रकारे शुटिंग करताना त्यांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीकाही सुरु झाली आहे.

पाच मीटर लांब अॅनाकोंडाला शेतकऱ्यांनी दोरखंडाने पकडून ठेवलं आहे. त्याला वासरापासून लांब नेऊन पाण्यात सोडण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पाहा व्हिडिओ :