US Supreme Court: लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात (Rape and Murder Case) 24 वर्षांपूर्वी सुनावण्यात आलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर अमेरिकेतील सुप्रीम कोर्टात (US Supreme Court) सुनावणी होणार आहे. मानवाधिकार संघटना, सेलिब्रेटी, खासदार आणि हजारो अमेरिकन नागरिकांनी केलेल्या विनंतीनंतर सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे. 


रॉडनी रीड या आफ्रो-अमेरिकन नागरिकाला 1998 मध्ये एका 19 वर्षीय  स्टिट्स या श्वेतवर्णीय महिलेवर बलात्कार आणि हत्येच्या आरोपात शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या शिक्षा भोगत असलेल्या रॉडनी रीड याचे वय 54 आहे. वैद्यकीय चाचणीत पीडित स्टिट्सच्या शरीरावर दोषी व्यक्तीचे शुक्राणू सापडले होते. ही घटना 1996 मध्ये घडली होती. त्यावेळी आरोपी रीडने आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. मृत  स्टिट्स आणि आपल्यात परस्परसंमतीने शरीरसंबंध ठेवले असल्याचे त्याने सांगितले होते. 


सुप्रीम कोर्टात काय होणार?


पुराणमतवादी वर्चस्व असलेल्या सुप्रीम कोर्टात पुन्हा नव्याने रीडचा जबाब ऐकला जाणार नाही. मात्र, या खटल्यातील काही दुर्लक्षित तांत्रिक बाबींकडे लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे. 


9 सदस्यीय कोर्टात या प्रकरणी काही महिन्यात निकाल येण्याची शक्यता आहे. यामध्ये रीडशी संबंधित खटला पुन्हा सुरू करायचा की त्याला इंजेक्शनद्वारे मृ्त्यूदंडाची शिक्षा द्यायची याबाबत सुप्रीम कोर्ट निकाल देईल. 


रीडसाठी आवाज उठवणाऱ्यांच्या मते नवीन पुरावे हे खरे दोषी शोधू शकतील. तरुणीच्या हत्येप्रकरणात  इतर संशयित समोर येतील. यामध्ये त्यावेळी असलेला नियोजित वर जिमी फेनल, कर्तव्यावर असताना अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेला पोलीस अधिकारी या दोघांवर संशय आहे. 


दोषी पोलीस अधिकारी फेनल याने एका कैद्याजवळ स्टिट्सची हत्या केली असल्याची कबुली दिली असल्याचा दावा केला आहे. स्टिट्सचे एका कृष्णवर्णीय व्यक्तीसोबत शरीरसंबंध असल्याने तिची हत्या केली असल्याचे फेनलने सांगितले. मात्र, फेनलने या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणात पोलिसांनी फेननला संशयित मानले होते. टेक्सासमधील वकिलांनी रीडने याआधीदेखील काही महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खटल्याच्या सुनावणीदरम्यान केला होता. 


मृत्यूदंडाची शिक्षा लांबली


रीडच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर 2019 मध्ये अंमलबजावणी होणार होती. मात्र, रिअल्टी स्टार किम कार्दशियन, गायिका रिहाना, रिपब्लिकन पक्षाचे खासदार टेड क्रूझ आदींसह अनेकांनी केलेल्या स्वाक्षरी मोहिमेनंतर मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. 


निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी खटपट 


आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी रीडने 2014 मध्ये टेक्सासमधील अधिकाऱ्यांना स्टिट्सच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पट्ट्याचे डीएनए विश्लेषण करण्याची विनंती केली होती. मात्र, टेक्सास कोर्ट ऑफ क्रिमिनलने त्याची विनंती वारंवार फेटाळली. त्यानंतर त्याने फेडरल कोर्टाकडे धाव घेतली. मात्र, शिक्षेला आव्हान देण्याचा दोन वर्षांच्या मुदतीचा कालावधी लोटल्याने कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 


डीएनए चाचणी कधी केली जावी, यासाठी कालमर्यादा ठेवणे हे चुकीचे असल्याचे रीडच्या वकिलांनी सांगितले.