अमेरिकेनं भारताला समजूत देण्याआधी पाकिस्तानलाच दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. आणि पाकिस्ताननं त्यांच्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देणं थांबवावं, असंही स्पष्ट केलंय.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकाटमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला. यानंतर अमेरिकेने या विषयी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमधील या ऑपरेशनसाठी भारताला अमेरिकेची साथ मिळाली असून अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद संपवण्याच्या सल्ला दिला आहे.
दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे गरजेचे असल्याने भारताविरोधात लष्करी कारवाई टाळावी आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, असे अमेरिकेने पाकला सुनावले आहे. सध्या भारत – पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करुन याबाबतची माहिती दिली.
VIDEO | भारताने कशी रचली 'एअर स्ट्राईक'ची स्ट्रॅटर्जी | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली. संरक्षणसंदर्भातील सहकार्य आणि या भागातील शांतता कायम रहावी, यासंदर्भात चर्चा केल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्याशी देखील पोम्पिओ यांनी चर्चा केली. तणाव कमी करण्यासाठी लष्करी कारवाई टाळावी आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई करावी, असे त्यांनी पाकला सांगितले. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी लष्करी कारवाई टाळून थेट चर्चा करावी, असे देखील अमेरिकेने म्हटले आहे.
भारताच्या हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 350 दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर इम्रान खान यांनी भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर देणार, असे सांगितले होते.