वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प असा सामना रंगणार आहे.
यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या ओहियोच्या क्लिवलॅण्डमध्ये सुरु असलेल्या वार्षिक संमेलनात डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव निश्चित करण्यात आलं. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर एकमत झालं.
राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार हा माझा सन्मान असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी संमेलनात संबोधित करताना दिली. "ही निवडणूक जिंकून अमेरिकेत खऱ्या अर्थाने बदल घडवेन. त्यामुळे रिपब्लिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला असाच पाठिंबा द्यावा," असंही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांच्या निवडीनंतर संमेलनाला संबोधित करताना त्यांची मुलगी इव्हांका ट्रम्प म्हणाली की, "हे अविस्मरणीय आहे, स्वप्नासारखं आहे. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. ही निवडणूक ऐतिहासिक आहे."