Donald Trump Warn Iran: इराणविरुद्धच्या इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांना लक्ष्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. इराण आणि इस्त्राईल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने थेट हस्तक्षेप करत इराणवरील तीन महत्त्वाच्या आण्विक तळांवर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या या कारवाईची पुष्टी खुद्द इराणी माध्यमांनी केली असून, इस्फहान, नतान्झ आणि फोर्डो येथील आण्विक तळांवर अमेरिकेने बॉम्बहल्ले केल्याची माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि इराणला कठोर इशारा दिला आहे. “जर इराणने युद्ध थांबवले नाही, तर हल्ले आणखी तीव्र करण्यात येतील,” असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. रॉयटर्सने ट्रम्प यांच्या हवाल्याने सांगितले की, “इराणने तातडीने युद्ध थांबवावे अन्यथा त्यांना पुन्हा आणखी हल्ल्यांना सामोरे जावे लागेल.”
दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आपल्या बाजूने सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीच त्यांच्या आण्विक ठिकाणांवरील युरेनियमचा साठा त्या ठिकाणांवरून हटवण्यात आला होता. मार्च महिन्यातच संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व संवेदनशील साहित्य योग्य ठिकाणी हलवले होते, असा दावाही इराणने केला आहे.
दरम्यान हा हल्ला झाला तेव्हा व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, जेव्हा अमेरिकन सैन्याने इराणवर हवाई हल्ला केला, तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासह वॉर रूममध्ये उपस्थित होते आणि प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. रविवारी सकाळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टद्वारे इराणच्या तीन अणुस्थळांवर झालेल्या हल्ल्यांची माहिती दिली. ते म्हणाले, "सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत आणि सुरक्षितपणे घरी परतत आहेत.फोर्डो नावाच्या जागेवर सर्वाधिक बॉम्ब टाकण्यात आले." त्यांनी अमेरिकन सैन्याचे कौतुक केले आणि म्हटले, "आमच्या महान योद्ध्यांचे अभिनंदन! जगातील इतर कोणतेही सैन्य हे करू शकत नाही." यासोबतच त्यांनी म्हटले की आता शांततेचा काळ आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयाला काहीचे समर्थन तर काहींचा विरोध
काही रिपब्लिकन पक्षाच्या अनेक नेत्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. शनिवारी, 21 जून 2025 रोजी ट्रम्प यांनी या हल्ल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर सीनेटर लिंडसे ग्राहम यांनी ‘खूप छान, अध्यक्ष ट्रम्प’ अशी प्रतिक्रिया दिली. टेक्सासचे सीनेटर जॉन कॉर्निन यांनी याला ‘धाडसी निर्णय’ म्हटले. अलाबामाच्या सीनेटर केटी ब्रिट यांनी या हल्ल्याला ‘सशक्त आणि अचूक (सर्जिकल)’ म्हटले आणि ट्रम्प यांच्याबरोबर उभं राहण्याची भूमिका घेतली. परंतु, यावर काही विरोधही झाला. केंटकीचे प्रतिनिधी थॉमस मॅसी यांनी ट्रम्प यांचा निर्णय “घोषणाविनाच युद्ध सुरू करणं हे असंवैधानिक आहे” असे म्हणत टीका केली. ते विदेशी युद्धातील अमेरिकी सहभागाचे कायम विरोधक राहिले आहेत.