... तर उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्ध्वस्त करु, ट्रम्प यांचा थेट इशारा
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2017 09:42 PM (IST)
संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भाषण केलं. उत्तर कोरियाला थेट उद्ध्वस्त करण्याचा इशारा त्यांना दिला.
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत पहिल्यांदाच बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरिया आणि दहशतवादावर कठोर शब्दात हल्लाबोल केला. शिवाय अमेरिकेला काही धोका निर्माण झाला तर उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसेल, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगचा ट्रम्प यांनी रॉकेट मॅन म्हणून उल्लेख केला. रॉकेट मॅन त्यांच्या देशातील लोक आणि भ्रष्ट सरकारमुळे आत्मघातकी मिशनवर आहे. उत्तर कोरियाची आण्विक शस्त्र बाळगण्याची इच्छा आणि मिसाईल चाचणीमुळे जगभरात दहशतीचं वातावरण आहे. आण्विक अप्रसार करण्याशिवाय काहीही पर्याय नाही हे उत्तर कोरियाने समजून घ्यावं, असंही ट्रम्प यांनी ठणकावलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्लामिक दहशतवादाच्या मुद्द्यावरही बोट ठेवलं. अल-कायदा, हिजबुल्लाह यांसारख्या दहशतवादी संघटनांना बळ देणाऱ्या देशांचाही पर्दाफाश करण्याची गरज असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. भारताने पाकिस्तानला दहशतावादावरुन घेरलं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 36 व्या संमेलनात भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावरुन घेरलं. भारताने पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा चेहरा असल्याचं सांगितलं. पाकिस्तानने त्यांचा दहशतवादाचा कारखाना बंद करावा, असा थेट इशारा भारताने दिला. संबंधित बातम्या :