सिडनी : इस्लामिक स्टेट म्हणजेच आयसिसमध्ये भरती करणाऱ्या अरेबियन माणसाशी संवाद साधण्यासाठी मूळचा अमेरिकन असलेल्या आणि आता ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अशेर खान याने गूगल ट्रान्सलेटचा वापर केला आहे, असा आरोप अमेरिकेच्या वकिलाने केला आहे. मात्र, गूगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून आयसिसमध्ये सहभागासाठी प्रयत्न करणाऱ्या अशेरवर आयुष्यभर तुरुंगात खितपत पडण्याची वेळ आली आहे.
या प्रकरणात 21 वर्षीय अशेर खान दोषी आढळल्यास त्याला संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावं लागणार आहे. सप्टेंबरमध्ये सुनावणीदरम्यान अशेर दोषी आढळल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असं टेक्सासमधील डिस्ट्रिक्ट कोर्टाने म्हटलं आहे.
अशेर खान हा 2013 मध्ये होस्टनहून सिडनीला आपल्या कुटुंबासोबत राहायला गेला. आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियामध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता, असा आरोप अशेरवर ऑस्ट्रेलियात झाला आहे.
अमेरिकन वकिलाने फॉरेन्सिक रिपोर्ट्स सादर केले, ज्यामध्ये अशेरच्या आयफोन आणि कम्प्युटरमधील गूगल ट्रान्सलेटची हिस्ट्री, स्काईप चॅट मसेजिंग हिस्ट्री इत्यादी आहे.
"I want to join jihad, but live in Australia?" म्हणजे "मला जिहादमध्ये सहभागी व्हायचंय, मात्र मी ऑस्ट्रेलियात राहतो" असं अशेरने गूगल ट्रान्सलेटवर टाईप केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे, "How Can I come? I don't speak Arabic, only english and urdu" म्हणजे, "मी कसा येऊ शकतो? मला अरेबिक भाषा येत नाही. इंग्रजी आणि उर्दू भाषाच येते." असेही अशेरने गूगल ट्रान्सलेटवर टाईप केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अशेरबाबतचं प्रकरण गंभीररित्या घेण्यात आलं आहे.
आयसिसमध्ये भरती करणारा ऑस्ट्रेलियातील मोहम्मद झुहमीसोबत अशेरवर अनेक आरोप आहेत. ज्यामध्ये आयसिसला साहित्य पुरवणे इत्यादींचा समावेश आहे.
24 फेब्रुवारी 2014 साली अशेर खानने मलेशियामार्गे सिडनी ते तुर्की असा प्रवास केला होता आणि त्याचा टेक्सासमधील मित्र सिक्स्टो गार्शियाही होस्टनहून तुर्कीला गेल्याचा आरोप आहे.
अशेर खान आण झुहबी यांच्यावर दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करणे, तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये भरती करणे इत्यादी गंभीर आरोप आहेत.