नवी दिल्ली : दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धाचा फटका बसलेल्या 600 भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन संकटमोचन' सुरु केलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह या ऑपरेशनचं नेतृत्त्व करणार आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबतची माहिती दिली.

 

 

या ऑपरेशनमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अमर सिन्हा, संयुक्त सचिव सतबीर सिंह आणि संचालक अंजनी कुमार हे तीन वरिष्ठ अधिकारी जनरल व्ही. के. सिंह यांच्यासोबत असतील. सुदानमधील भारतीय राजदूत श्रीकुमार मेनन आणि त्यांची टीम या ऑपरेशनला पार पाडत आहे. हवाईदलाची दोन C-17 ही विमानं सुदानमध्ये रवाना केली आहे.

 

 

हिंसेचं कारण

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या गटातील संघर्षामुळे सुदानला अंतर्गत यादवीने पछाडलं आहे. यामध्ये 200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राष्ट्रपतींनी सोमवारीच युद्धविरामची घोषणा केली होती.

 

संबंधित बातमी : सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवा, अक्षयचं ट्वीट


 

600 भारतीय अडकले

या गृहयुद्धाचा फटका तिथे उद्योग, व्यवसाय, नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांना बसत आहे. दक्षिण सुदानमध्ये सुमारे 600 भारतीय नागरिक अडकले आहे. देशाची राजधानी जुबामध्येच 450 भारतीय असून या शहराबाहेर 150 भारतीय नागरिक असल्याचं सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

 

 

भारतीयांच्या मदतीसाठी अक्षयची स्वराज यांना विनंती

दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी विनंती बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना केली. त्यानंतर स्वराज यांनी अक्षयच्या ट्वीटची तातडीने दखल घेतली. अक्षय कुमारजी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे, अशा शब्दात अक्षयला सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलं.

 

अक्षय कुमार आपल्या देशभक्तीपर भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘एअरलिफ्ट’ सिनेमात अक्षय कुमारने भारतीय उद्योजक रंजीत कातियालची भूमिका साकारली होती. ‘एअरलिफ्ट’मधील रंजीत कातियाल कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यात महत्वाची भूमिका निभावतो.