US Independence Day : अमेरिकेत (America) दरवर्षी 4 जुलै रोजी स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा केला जातो. यंदा अमेरिका 247 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. अमेरिकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय सुटी असून आजच्या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. जगातील सर्वात बलाढ्य देश मानला जाणारा अमेरिका देशही ब्रिटनचा गुलाम होता, हे अनेकांना माहीत नसेल.
4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं
आज अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. अमेरिकेला महासत्ता असंही म्हटलं जातं. पण अमेरिका देखील इंग्रजांची गुलाम होती. भारताप्रमाणेच या देशातील जनतेवरही इंग्रजांनी अत्याचार केले. मोठ्या लढ्यानंतर अमेरिकेला 4 जुलै 1776 रोजी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं.
कोलंबसच्या एका चुकीची अमेरिकेला शिक्षा
ख्रिस्तोफर कोलंबसच्या (Christopher Columbus) एका चुकीची शिक्षा अमेरिकेला भोगावी लागली, असं सांगितलं जातं. कोलंबस भारतात येण्यासाठी युरोप सोडून चुकून अमेरिकेत पोहोचला. जेव्हा कोलंबसने ब्रिटनमधील लोकांना अमेरिका या नवीन बेटाबद्दल माहिती दिली. त्यानंतर अमेरिकेवर ताबा मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लढा झाला. यावेळी ब्रिटिशांनी मोठ्या संख्येने या बेटावर पोहोचले आणि अमेरिका ब्रिटिशांच्या ताब्यात गेली.
अमेरिकेत ब्रिटनच्या 13 वसाहती होत्या
अमेरिकेत ब्रिटनच्या 13 वसाहती होत्या. 1776 पूर्वी, सर्व वसाहतींना साखर, कॉफी, चहा किंवा स्पिरिट सारख्या वस्तूंच्या आयातीसाठी उच्च शुल्क द्यावं लागत होतं. इंग्रजांनी अमेरिकन जनतेवर अत्याचार केले. यामुळे ब्रिटिश राजवटीबद्दल वाढता असंतोष वाढला. यानंतर 2 जुलै 1776 रोजी अमेरिकेच्या जनतेने 12 वसाहतींपासून स्वतंत्र घोषित केलं. ग्रेट ब्रिटनपासून वेगळे होण्याचा निर्णय मोठा होता.
स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी मतदान
कॉन्टिनेन्टल काँग्रेसने स्वातंत्र्याची मागणी केली होती. 4 जुलै 1776 रोजी, 13 वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा स्वीकारण्यासाठी मतदान केलं. 13 वसाहतींच्या प्रतिनिधींनी जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली आणि अमेरिकन जनतेला स्वातंत्र्य मिळालं. या दिवसापासूनच अमेरिकेत स्वातंत्र्य दिन साजरा केला जाऊ लागला. 13 वसाहतींनी मिळून स्वातंत्र्य घोषित केलं, याला स्वातंत्र्याची घोषणा असंही म्हणतात. थॉमस जेफरसन हे देखील कॉन्टिनेन्टल काँग्रेसच्या सदस्यांमध्ये होते. त्यांनीच समितीचे इतर सदस्य जॉन अॅडम्स, रॉजर शर्मन, बेंजामिन फ्रँकलिन आणि विल्यम लिव्हिंग्स्टन यांच्याशी चर्चा करून ही घोषणा तयार केली.
फ्रान्सकडून अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट
फ्रान्सने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट म्हणून दिला होता. 4 जुलै 1776 रोजी संयुक्त राज्य अमेरिकेला ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फ्रान्सने अमेरिकेला ही भेट दिली होती. फ्रान्सने 1876 मध्ये अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट दिला होता. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं प्रतिक मानलं जातं. 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'चा अर्थ स्वातंत्र्याचा पुतळा असं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सुमारे 136 वर्ष जुना आहे. 1984 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.