Donald Trump Case: अमेरिकेचे (US) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) न्यूयॉर्क (New York) कोर्टात हजर झाल्यानंतर फ्लोरिडाला परतले. तिथे त्यांनी न्यायालयातील हजेरीनंतर जाहीर निवेदन जारी केलं. ते म्हणाले, "अमेरिकेत असं काही घडू शकते, असं मला कधीच वाटलं नव्हतं. निर्भयपणे माझ्या देशाचे रक्षण करणं हा एकमेव गुन्हा मी केला आहे. आपला देश नरकात जातोय."
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "समर्थकांच्या जमावानं त्यांच्या समर्थनार्थ टाळ्या वाजवल्या कारण त्यांच्यावरील कारवाई हे राजकीय षडयंत्र आहे. बायडन यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, हे खोटं प्रकरण केवळ आगामी 2024 च्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी समोर आणण्यात आलं असून ते तात्काळ हटवण्यात यावं. तसेच, त्यांनी न्यायमूर्ती जुआन मार्चेन यांना ट्रम्प यांचा द्वेष करणारे न्यायाधीश म्हणून संबोधलं आहे. तसेच न्यायाधीशांची मुलगी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासाठी काम करत असल्याचंही म्हटलं आहे.
Not Guilty म्हणत स्वतः निर्दोष असल्याचं केलं स्पष्ट
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले किंवा माजी राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना गुन्हेगारी खटल्याचा सामना करावा लागत आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी त्यांच्या वकिलांसह याचिका दाखल करताच न्यायालयात हात जोडून बसले. या आरोपांबद्दल त्यांना काय म्हणायचे आहे, असं विचारलं तेव्हा ट्रम्प म्हणाले, 'Not Guilty'.
हे प्रकरण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवसांआधीचं आहे. ऑक्टोबर 2016 च्या अखेरीस पॉर्न स्टार डॅनियल्सला त्याच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीनं 130,000 US डॉलर्सचं पेमेंट केल्या संबंधित आहे. एका दशकापूर्वी ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल पॉर्न स्टारनं कोणताही खुलासा करु नये. तसेच याप्रकरणा संबंधात कोणतीही वाच्यता करु नये यासाठी ही रक्कम पॉर्न स्टारला पुरवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
याप्रकरणासंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात स्वतः निर्दोष असल्याचं सांगितलं. तसेच, त्यांनी हेराफेरीची 34 प्रकरणं चुकीची असल्याचंही सांगितलं. सुनावणीनंतर ट्रम्प रात्री एक वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) कोर्टातून बाहेर पडले.
इतिहासात पहिल्यांदाच
ट्रम्प येण्यापूर्वी न्यायालयाजवळ कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ट्रम्प आठ कारच्या ताफ्यात कोर्टात पोहोचले. गुन्हेगारी खटल्याला सामोरे जाणारे ट्रम्प अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
रिपब्लिकन पक्षाशी संबंधित असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी फ्लोरिडा सोडण्यापूर्वी 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर लिहीलं की, त्यांचा सतत छळ होत आहे. ट्रम्प यांनी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याच्या संदर्भात कोणताही गैरव्यवहार झाल्याचं नाकारलं आहे. ट्रम्प अध्यक्ष असताना मॅनहॅटन जिल्हा वकील कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :