वॉशिग्टन : अमेरिकेतील 12 वर्षावरील बालकांना Pfizer-BioNTech ची कोरोना लस देण्यास अन्न आणि औषधं प्रशासनाकडून (FDA) मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेच्या लसीकरणाच्या कार्यक्रमातील आणि कोरोना विरोधातल्या लढ्यातील हा एक महत्वाचा निर्णय आहे.  गेल्या आठवड्यात अशा प्रकारची मान्यता देण्याचा प्रस्ताव अन्न आणि औषधं प्रशासनासमोर (FDA) आला होता. 


 






लहान मुलांना कोरोनाची लस देण्यामुळे कोरोनाच्या भविष्यातील लाटेविरोधात संरक्षण मिळेल असा कयास अमेरिकेतील तज्ज्ञांकडून मांडला जातोय. आपल्या मुलांना आता कोरोनाची लस द्यावी असं आवाहनही सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे. अमेरिकेत 12 ते 15 वयोगटातील बालकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या 16 वर्षावरील सर्वांना Pfizer ची लस देण्याच्या निर्णयाला या आधीच मंजुरी मिळाली आहे. 


Pfizer कंपनीने 12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास गेल्या महिन्यापूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा Pfizer च्या वतीनं करण्यात आला आहे. 


कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले अमेरिकेतील नागरिक आता विनामास्क घराबाहेर फिरु शकतात. या नागरिकांना छोट्या ग्रुपमध्ये भेटता येईल, परंतु त्यांनी गर्दीची ठिकाणं टाळावीत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन अमेरिकेच्या या संस्थेने गेल्या आठवड्यात हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी कोरोनामुक्त झालेल्या इस्रायलने देखील अशाच प्रकारचं पाऊल उचललं होतं. तिथेही काही नियमांसह विनामास्क घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. इस्रायलमधील सुमारे 60 टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालं आहे.


महत्वाच्या बातम्या :