Virgil Abloh Death :  अमेरिकेतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर व्हर्जिल अबलोह यांचं 41 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं फॅशन जगताला मोठा धक्का बसला आहे. ते लुई व्हिटॉनच्या मेन्सवेअर कलेक्शनचे (LVMH) कलात्मक दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे.  41 व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देताना काल त्यांचं निधन झालं. त्यांचे पालक घानामधून युनायटेड स्टेट्समध्ये स्थलांतरित झाले होते.






फ्रेंच फॅशन हाऊसचे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन क्रिएटिव्ह डायरेक्टर अबलोह यांनी कॅटवॉकसाठी हूडीज आणि स्नीकर्ससारखे स्ट्रीटवेअर आणले होते. त्यामुळं त्यांची वेगळी ओळख होती. त्यांनी फॅशन जगतात एक वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे जगभरात धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर प्रतिस्पर्धी डिझाइन हाऊसकडून आदरांजली वाहण्यात आली सोबतच दिग्गज कलाकार आणि सेलिब्रिटींनी देखील अबलोह यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.  


LVMH चे मुख्य कार्यकारी बर्नार्ड अर्नाल्ट यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्वजण या भयानक बातमीने सुन्न झालो आहोत. व्हर्जिल केवळ एक प्रतिभाशाली डिझायनर, एक दूरदर्शी व्यक्तीच नव्हता तर एक चांगला आणि हुशार माणूस देखील होता, असं अर्नाल्ट यांनी म्हटलं आहे. एलव्हीएमएच परिवार या दु:खाच्या क्षणी त्याच्या परिवारासोबत आहे असे त्यांनी एलव्हीएमएचच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


अबलोह यांनी त्यांच्या पॅरिसमधील जानेवारीच्या शोमध्ये वंशविद्वेषविरोधी आणि होमोफोबिया विरोधी संदेशांसह लुई व्हिटनसोबतच्या त्यांच्या कामात पर्यावरणीय आणि सामाजिक दोन्ही गोष्टींवर भूमिका घेत आपली स्पष्ट मतं मांडली होती. 


2018 मध्ये लुई व्हिटॉनच्या पुरुषांच्या कपड्यांमध्ये सर्वोत्तम कलात्मक दिग्दर्शक म्हणून अबलोहची निवड करण्यात आली होती. अबलोह यांच्या निधनानंतर जगभरातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.