वॉशिंग्टन : अमेरिकेत नवीन राष्ट्रपतीपदासाठी मतगणना सुरु आहे. आतापर्यंत 50 पैकी 22 राज्यांचे निकाल हाती आले असून 12 राज्यांमध्ये ट्रम्प तर 10 राज्यांमध्ये बायडन यांनी विजय मिळवला आहे. तर इलेक्टोरल मतदानामध्ये डेमोक्रेटचे उमेदवार बायडन हे ट्रम्प यांच्या पुढे आहेत. जो बायडन यांना आतापर्यंत 129 तर ट्रम्प यांना 94 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. अमेरिकेत एकूण इलेक्टर्सची संख्या 538 आहे आणि बहुमतासाठी 270 चा आकडा गाठायचा आहे. मतगणनेच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसची सुरक्षा वाढवली आहे. या ठिकाणी कडक सुरक्षेची व्यवस्था केली आहे.
अमेरिकेत नवी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा बाजी मारणार की डेमोक्रेटचे जो बिडेन जिंकणार याकडे अख्ख्या जगाचे लक्ष लागले आहे. यातच ट्रम्प यांनी ट्वीट करत आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
माझ्यासाठी जिंकणं सोपं, हार पचवणं कठिण- ट्रम्प
अमेरिकेच्या लोकांना धन्यवाद देत ट्रम्प यांनी ट्वीट केलं आहे की, आम्ही संपूर्ण देशात चांगल्या स्थितीत आहोत. अमेरिकत वोटिंग सुरु आहे. सर्वांनी मतदान करावं. माझ्यासाठी जिंकणं सोपं आहे मात्र हार पचवणं कठिण आहे, असं त्यांनी म्हटलंय.
पुढील वर्ष सर्वात महान इकॉनॉमी वर्ष असेल
आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत दावा केला होता की, त्यांच्या सरकारच्या काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था 33.1 टक्क्यांनी सर्वात वेगाने वाढली आहे. ते म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासात पुढील वर्ष सर्वात महान इकॉनॉमी वर्ष असेल.
विक्रमी मतदान
अमेरिकेत यंदा राष्टपदीपदासाठी विक्रमी मतदान झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील ओरेगन हे पाचवं राज्य आहे, जिथं 2016 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झालं आहे. यावेळी 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानाद्वारे आपलं मतदान केलं होतं. यामुळं यंदा विक्रमी मतदान झालं असल्याचा अंदाज आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये सोबतच निवडणूक पार पडत आहे. जवळपास 24 कोटी मतदाता मतदानाचा हक्क बजावणार आहेत.