न्यूयॉर्क : अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जो बायडेन यांना अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जाहीर करण्यात आलं आहे.


डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होणार आहेत. पेनसिल्वेनियामधील मतमोजणी अखेर संपली आणि जो बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं आहे.


बायडन यांनी या राज्यांमध्ये विजय मिळवला


बायडन यांनी वेस्ट वर्जीनिया, वॉशिंगटन कॅलिफोर्निया, कोलोराडो, न्यू हॅम्पशायर, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, न्यूयॉर्क, न्यू मॅक्सिको, वर्मोंट, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मैरीलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, टेनेसी ओरेगन, विस्कॉन्सिन, रोड आयलँड, वरमोंट, हवाई, मिशिगन, मिनेसोटा आणि रोड आयलँडमध्ये आतापर्यंत विजय मिळवला आहे.





जो बायडेन यांच्या या राजकीय काराकिर्दीची सुरुवात आजपासून बरोबर 48 वर्षांपूर्वी झाली. 1972 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा अमेरिकन सीनेटसाठी निवडून गेले होते.  तेव्हा सीनेटवर निवडून गेलेल्या सर्वात कमी वयाच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला गेला. आणि आता ते सर्वात वयस्कर राष्ट्राध्य़क्ष होतील. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या कारकिर्दीत बायडेन दोन वेळा उपराष्ट्राध्यक्ष होते. महत्त्वाचं म्हणजे ओबामा यांनी 'अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात प्रभावी उपराष्ट्रपती' असा त्यांचा उल्लेखही केला होता. जो बायडेन हे बराक ओबामा यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. या निवडणुकीत तर ओबामा बायडेन यांचा प्रचारही करत होते.


जो बायडन अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक


माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उप राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडन यांनी आठ वर्ष काम केलं आहे. ओबामांसोबत बायडन यांनी भारतीय नेतृत्त्वासोबत चांगले संबंध जोपासले आहेत. याशिवाय बायडन यांचे भारतीय अमेरिकन्ससोबतही जिव्हाळ्याचे संबंध आहेत.


जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रपती झाले तर भारतावर काय परिणाम होणार?


बायडन यांनी वेळोवेळी भारताचं समर्थन केलं आहे. नुकतंच ट्रम्प यांनी भारतातील अस्वच्छतेवरुन 'घाण देश' असल्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यावरुनही बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. तसेच बायडन म्हणाले होते की, आम्ही भारतासोबतच्या मैत्रीची कदर करतो. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिका भारतासोबत आहे. आम्ही भारतासोबत मिळून यावर काम करु. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सोबत आहोत, असं ते म्हणाले होते.


अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगावर परिणाम होईल


जो बायडन यांचा निवडणूक जिंकल्याचा परिणाम केवळ अमेरिकेवरच नव्हे तर संपूर्ण जगावर होणार आहे. त्यांनी स्वतः असं म्हटलं आहे की सत्तेत येताच ते ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांमध्ये बदल करणार आहे. यात अमेरिका आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित देशांतर्गत बाबींचा समावेश आहे.