Pegasus Issue: जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या पेगासस हेरगिरी प्रकरणी अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने पेगासस स्पायवेअर विकसित करणाऱ्या इस्रायलच्या एनएसओ ग्रुपला काळ्या यादीत टाकले आहे. काही महिन्यांपूर्वी एनएसओ ग्रुपच्या पेगासस या स्पायवेअरने जगातील काही देशांमधील महत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी झाल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. 


अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने याबाबतचे एक वक्तव्य जारी केले होते. पेगासस स्पायवेअर कथितपणे पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, जगभरातील विरोधी पक्ष नेत्यांची हेरगिरी करण्यासाठी वापरण्यात आले होते. या कारणास्तव बुधवारी एनएसओ ग्रुप आणि आणखी एक इस्रायली कंपनी कँडिरूचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 


एनएसओ ग्रुप आणि आणखी एक इस्रायली कंपनी कँडिरू यांनी परदेशातील सरकारांसाठी स्पायवेअर तयार केले होते. या स्पायवेअरच्या मदतीने सरकारी अधिकारी, पत्रकार, व्यावसायिक आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांची हेरगिरी करण्यात आली.


एनएसओ ग्रुपला काळ्या यादीत टाकण्याबाबत अमेरिकेने म्हटले की, अमेरिकन सरकार मानवाधिकारांना आपल्या परराष्ट्र धोरणात केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार, चुकीच्या हेतूने वापर होत असलेल्या डिजीटल उपकरणांचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याशिवाय, सायबर गुन्हेगारीचा मुकाबला करणे आणि बेकायदेशीर हेरगिरीला आळा घालण्याचेही काम असल्याचे अमेरिकेने म्हटले. 


अमेरिकेने इस्रायली कंपनी कँडिरू आणि एनएसओ ग्रुपशिवाय इतर दोन कंपन्यांनाही काळ्या यादीत टाकले आहे. यामध्ये सिंगापूर येथील कॉम्प्युटर सिक्युरिटी इनिशिएटिव्ह कन्सल्टेंसी पीटीई (COSEINC) आणि रशियन कंपनी पॉझिटीव्ह टेक्नोलॉजीचा समावेश आहे. या कंपन्यांचा समावेश काळ्या यादीत केल्याने अमेरिकेत या कंपन्यांकडून कोणतीही सेवा खरेदी केली जाऊ शकत नाही. 


आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही माध्यमसमूहांनी पेगासस हेरगिरी प्रकरण समोर आणल्यानंतर खळबळ उडाली होती. भारतासह अनेक देशांच्या पत्रकारांची पेगासस मार्फत हेरगिरी करण्यात आली असल्याचे समोर आले. काही देशांनी पेगासस प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.