वॉशिग्टन : ज्या लोकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत, आणि ज्यांना बुस्टर डोसची गरज आहे त्यांना मिक्स बुस्टर डोस देण्यास अमेरिकेत मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग ऑथोरिटीने (Food and Drug Administration-FDA) ही मान्यता दिली आहे. एकाच लसीचा बुस्टर डोस हा तुलनेने जास्त सुरक्षित नसतो, जर मिक्स लसींचा बुस्टर डोस दिल्यास तो अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असतो असं एफडीएने म्हटलं आहे.
अमेरिकेत फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन या लसींच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस देण्यात आले असतील तर ठराविक काळानंतर त्याला बुस्टर डोस देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे. पण सिंगल लसीच्या बुस्टर डोसपेक्षा जर मिक्स लसीचा बुस्टर डोस दिला तर तो अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असेल असं एफडीएने म्हटलं आहे.
दोनच दिवसांपूर्वी भारतात ICMR ने मिक्स लस देण्यास मान्यता दिली होती. दोन लसींच्या एकत्रिकरणानंतर लसीचा परिणाम वाढतो या निष्कर्षाजवळ आयसीएमआर आणि यूएस एफडीए दोघांचाही अभ्यास पोहोचला आहे. मिक्स लसीच्या वापराला अमेरिकेच्या आधी आयसीएमआरने परवानगी दिली आहे. देशातील लसीकरण आता 100 कोटींच्या टप्प्यावर आहे. त्यातच मिक्स डोसच्या वापराला मंजुरी देण्यात आल्याने यापुढे लसीकरणाला आणखी वेग येऊ शकतो.
कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या मिक्स डोसचा परिणाम अधिक चांगला येत असून त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली होते असं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे 'मिक्स अॅन्ड मॅच' या प्रकाराला आयसीएमआरने मंजुरी दिली आहे.
कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींचे प्रत्येकी एक डोस घेतले असता ते अधिक सुरक्षित आहेत आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत अधिक वाढ होईल असं सांगण्यात आलं आहे. त्या आधी एका अभ्यासातून आयसीएमआरने सांगितलं होतं की, कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
महत्वाच्या बातम्या :