नवी दिल्ली : भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने वेगेवगळ्या देशांकडे धाव घेतली आहे. संयुक्त राष्ट्र संघातही हा मुद्दा घेऊन जाण्यासाठी खटाटोप केले. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी याप्रकरणी विशेष सत्र बोलवण्याची विनंती संयुक्त राष्ट्राला केली होती.


पाकने सुरक्षा समितीचा अध्यक्ष देश पोलंडला पत्रही लिहीलं होतं. या कामात पाकला नेहेमीप्रमाणेच चीनची साथ मिळाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) बंद दाराआड चर्चा व्हावी, अशी मागणी चीनने केली होती. चीन या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे. त्यानुसार उद्या या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रशियाने भारताने घेतलेला निर्णय घटनात्मक असल्याचे सांगत भारताला पाठिंबा दिला आहे, तर संयुक्त अरब अमिरातीनेही हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे मान्य केले आहे. तर भारताने आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन केलं नसल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत पाकिस्तान युद्ध झालं तर त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल, असे म्हणत एकप्रकारे धमकी दिली आहे.

या आधी 1971 च्या बांग्लादेश युद्धाच्या वेळी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात चर्चिला गेला होता, त्यातूनच पुढे सिमला कराराची बीजं रोवली गेली होती. आता सुरक्षा परिषदेत उद्या गुप्त चर्चा झालीच तर त्यात नेमकं काय होईल याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष असणार आहे.