नवी दिल्ली : दहशतवाद थांबवला तरच आपल्यात चर्चा शक्य असल्याचे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत (UNSC) भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवले आहे.


काश्मीरला विशेष दर्जा आणि अधिकार देणारं कलम 370 भारताने रद्द केल्याच्या मुद्दयावरुन चीनच्या मागणीनुसार शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीत काश्मीरप्रश्नी झालेल्या सर्व करारांवर ठाम असल्याचे भारताच्या वतीने आवर्जून सांगण्यात आले. काश्मीरच्या मुद्यावरुन पाकिस्तानला केवळ चीनने पाठिंबा दिला आहे. तर अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स हे देश भारतासोबत आहेत.

यूएनएससीच्या बैठकीमध्ये सय्यद अकबरुद्दीन हे भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. बैठकीनंतर अकबरुद्दीन यांनी प्रसारमाध्यमांसमोर भारताची बाजू ठामपणे मांडली. अकबरुद्दीन म्हणाले की, काश्मीरप्रश्नी भारताकडून सर्व आंतरराष्ट्रीय करारांचे नियमांनुसार पालन करण्यात आले आहे. परंतु काही लोक कट्टर विचारसरणीच्या प्रचारासाठी काश्मीरमधील परिस्थिती भयावह असल्याच्या आरोळ्या ठोकत आहेत.

अकबरुद्दीन म्हणाले की, आम्ही आमच्या जनतेचा रक्तपात करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी काश्मीरमध्ये खबरदारीची पावले उचलली आहेत. काश्मीरमध्ये सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरते काही निर्बंध लावले आहेत. आम्ही ते निर्बंध टप्प्या टप्प्याने हटवू. तसेच कलम 370 रद्द करणे, हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय संबंधांवर काहीही परिणाम होणार नाही. परंतु तिथे सुरक्षेची कामे करताना या मुद्द्यावर आम्ही केलेल्या विविध करारांशी आम्ही बांधील आहोत.

अकबरुद्दीन यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी आम्ही विविध योजना आखल्या आहेत. जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या घोषणा केल्या आहेत.