कीव : रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ला करत आहे. आज (4 मार्च) पहाटे रशियाच्या हल्ल्यात झपोरीझियामध्ये अणुऊर्जा प्रकल्पात आग लागली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "युक्रेनच्या एनरहोदर शहरातील वीज केंद्रावर रशिया हल्ला केला. यातील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये आग लागली. ही आग किती मोठी आहे हे अद्याप स्पष्ट नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  


या घटनेनंतर अमेरिकेच्या अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेन्स्की यांच्याशी फोनवरुन बातचीत केली.


दुसरीकडे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी (28 फेब्रुवारी) एनरहोदर शहरावर ताबा मिळवण्याचा दावा केला होता. एनरहोदर हे नीपर नदीवर वसलेलं एक शहर आहे. एनरहोदरमध्ये युरोपातील सर्वात मोठं अणुऊर्जा प्रकल्प आहे. युक्रेनच्या एकूण वीज उत्पादनाच्या जवळपास 25 टक्के उत्पादन या प्रकल्पामध्ये होतं.


 






अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला न करण्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन
याच अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रवक्ते अँड्री तुज यांनी युक्रेनी टीव्हीला सांगितलं की, "सध्या रिअॅक्टरच्या नुतनीकरणाचं काम सुरु होतं. त्यामुळे ते कार्यरत नव्हतं. परंतु प्रकल्पात परमाणु इंधन आहे. तर युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आग लागल्यानंतर रशियन सैनिकांना युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला थांबवण्याचं आवाहन केलं आहे. कुलेबाने ट्वीट केलं आहे की, "रशियन सैन्य सातत्याने या प्रकल्पावर गोळीबार करत आहे. इथे आधीच आग लागली आहे, अशातच जर त्या प्रकल्पात स्फोट झाला तो चोरनोबिलपेक्षा 10 पट मोठा असेलं. यासाठी रशियन सैनिकांनी ताततीने हल्ला थांबवावा."






चर्चेची दुसरी फेरी निष्फळ, लवकरच पुन्हा चर्चा होण्याची शक्यता
दरम्यान दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांचे अधिकारी या संकटावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहे. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. आता तिसऱ्या फेरीची चर्चा लवकरच होण्याची अपेक्षा आहे.