UK Prime Minister : ब्रिटनमधील सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षानं (Conservative Party) दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाची (British Prime Minister) घोषणा 5 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होईपर्यंत बोरिस जॉन्सन (Boris Johnson) पदभार सांभाळणार आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी आतापर्यंत 11 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान पदासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. ऋषी सुनक हे भारतीय उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
ब्रिटनमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याची लाट
महाराष्ट्राप्रमाणेच ब्रिटनमध्येही गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत राजीनामे देण्यास सुरुवात केली. एकापाठोपाठ एक अशा मंत्रिमंडाळातील मंत्री आणि इतर सदस्य मिळून 60 जणांनी राजीनामे दिल्यामुळे बोरिस यांच्यावरही राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत गेला आणि अखेर बोरिस जॉन्सन यांनीही राजीनामा दिला.
बोरिस जॉन्सन यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला. त्यानंतर ब्रिटन सरकारमध्ये राजीनाम्याची लाट उसळली. जॉन ग्लेन, प्रीति पटेल, ग्रँट शॅप्स, रिचेल मॅक्लिएन आदींनी आपले राजीनामे देत सरकारच्या अडचणीत वाढ केली. काही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस यांच्या निवासस्थानी जात आपले राजीनामे सुपूर्द केले. तर, काहींनी बोरिस यांच्याच राजीनाम्याची मागणी केली होती.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी राजी नसल्याचं म्हटलं जात होतं. बोरिस जॉन्सन यांच्याकडूनही आपल्या मंत्र्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पंतप्रधानपद वाचवण्यासाठी बोरिस यांनी बैठकांचा धडाका लावला. ऋषी सोनक यांच्याऐवजी नदीम जहावी यांना अर्थ खात्याची धुरा सोपवण्यात आली होती. तर, स्टीव्ह बार्कले यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. मात्र, मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या अविश्वासामुळे जॉन्सन यांनी हुजूर पक्षाच्या गटनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदाचाही राजीनामा दिला.
भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी दावेदारी
भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांची ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून वर्णी लागणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत त्यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. सुनक यांनी बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पाहिली होती. बोरिस जॉन्सन यांच्यावर आरोप झाले होते, त्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ऋषि सुनक यांच्याकडे पंतप्रधानपद येणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. इंग्लंडसारख्या मोठ्या देशाचे पंतप्रधान झाल्यास ही भारतासाठी नक्कीच गौरवाची गौष्ट असेल.