ब्रिटन : ब्रिटनच्या एका वैज्ञानिकाने कोरोना व्हायरसबाबात मोठा दावा केला आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट केंट (Kent) संपूर्ण जगभरात पसरेल. यामुळे कोरोनव्हायरसविरुद्धची लढाई कमीत कमी दशकभर सुरु राहिल. ब्रिटनमधील जेनेटिक सर्विलिएन्स प्रोग्रामचे प्रमुखांनी सांगितलं की, "ब्रिटनच्या केंट परिसरात आढळलेला कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंटचा फैलाव जगभरात होण्याची शक्यता आहे. परिणामी कोरोना विषाणूविरुद्धची लढाई कमीत कमी दशकभर चालेल."


कोविड-19 जीनोमिक्स यूकेचे कन्सोर्टियमच्या संचालिका शेरॉन पीकॉक म्हणाल्या की, "केंट कोरोना व्हायरस व्हेरिएंट संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरला आहे आणि तो संपूर्ण जगभरात पसरेल." "पण मला वाटतं की, भविष्यात आपण अनेक वर्षे हेच करणार आहोत. आपण सध्या सहा वर्षांपर्यंत या विषाणूविरुद्धची लढाई सुरु ठेवणार आहोत," असंही त्यांनी सांगितलं.


युनायटेड किंग्डममध्ये कोरोना लस या व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी ठरली होती. परंतु व्हायरसचं बदलतं रुप पाहता कदाचित लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो, असंही शेरॉन पीकॉक म्हणाल्या.


कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात साडे तेवीस लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.


दरम्यान, ब्रिटनसोबतच दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्येही कोरोनाचे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत. शेरॉन पीकॉक यांच्या मते ब्रिटिश व्हेरिएंट जास्त संसर्गजन्य आहे. पण इतर व्हेरिएंटच्या तुलनेत तो जास्त धोकायदायक असेलच असं नाही. पण हा जगभरात पसरेल.


बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम
कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका सर्वाधिक असलेल्या देशांमधून येणाऱ्या लोकांवर कोरोविषयक नियमांचं उल्लंघन केल्यास ब्रिटनने सुमारे दहा लाख रुपयांचा दंड आणि दहा वर्षांचा तुरुंगवासाची तरतूद केली आहे. या नियमांमध्ये बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी1,750 पौंडच्या पॅकेजचाही समावेश आहे. यात दहा दिवस हॉटेलमध्ये राहण्याचा, येण्या-जाण्याचा आणि दोन अनिवार्य आरटीपीसीआर चाचणीचा समावेश आहे. बाहेरुन येणाऱ्या सर्वांना 10 दिवन क्वॉरन्टीन राहावं लागेल. या क्वॉरन्टीनच्या दुसऱ्या आणि आठव्या दिवशी त्यांना आरटीपीसीआर चाचणी करणं गरजेचं आहे.