बर्लिन: अमेरिका आणि ब्रिटन या दोन देशांतील कोरोना लसीकरणाची गती पाहता 2021 सालच्या शेवटपर्यंत ते देश हर्ड इम्युनिटी प्राप्त करतील असं जर्मनीतील स्टॅटिस्टा नावाच्या एका अहवालात सांगण्यात आलंय. या दोन देशांच्या तुलनेत युरोपियन युनियनमधील देश या गतीने हर्ड इम्युनिटी प्राप्त करु शकणार नाहीत असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय.
जर्मनीतील एक संशोधन करणारी संस्था स्टॅटिस्टाने अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियनच्या देशांचा कोरोना संबंधी आपला एक अभ्यास प्रकाशित केला आहे. त्यामध्ये या तीन प्रदेशातील लसीकरणाची स्थिती आणि हर्ड इम्युनिटी लेव्हल कधीपर्यंत प्राप्त होणार यावर भाष्य करण्यात आलंय.
स्टॅटिस्टाने अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील प्रत्येक देशातील स्थानिक आरोग्य संस्थाची रोजची आकडेवारी गोळा केली. त्यावरुन त्यांनी विस्तृत असा अहवाल तयार केला आहे. त्यांच्या अहवालात असं सांगण्यात आलंय की अमेरिकेत रोज 16 लाख तर ब्रिटनमध्ये रोज चार लाख 34 हजार लोकांचे कोरोना लसीकरण सुरु आहे. त्या तुलनेने जर्मनीमध्ये केवल एक लाख, फ्रान्समध्ये 96 हजार आणि इटलीमध्ये केवळ 67 हजार डोस देण्यात येत आहेत. ही संख्या अमेरिका आणि ब्रिटनच्या तुलनेत खूप कमी आहे.
अमेरिका आणि ब्रिटनची कोरोना लसीकरणाचा वेग पाहता हे दोन देश 2021 सालापर्यंत हर्ड इम्युनिटी गाठू शकतील. पण युरोपियन युनियनच्या इतर देशांचा विचार करता त्यांना त्यांच्या कोरोना लसीकरणाचा वेग तिप्पट वाढवणे गरजेचं आहे असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
या अहवालात सांगितल्याप्रमाणे घडलं तर G20 देशांच्या समुहातील अमेरिका हा पहिला देश असेल ज्याने हर्ड इम्युनिटी स्तर गाठला असेल.