Mann Ki Baat 100th Episode : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 'मन की बात' (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज (30 एप्रिल) प्रसारित होणार आहे. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी सरकार आणि भाजपने (BJP) जोरदार तयारी केली आहे. 100 वा भाग आज सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. 'मन की बात'च्या शंभराव्या भागापूर्वी एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे, ज्यामध्ये 'मन की बात' कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करताना कोणती तयारी केली जाते हे दाखवण्यात आलं आहे.


हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोककल्याण मार्गावरील  निवासस्थानी रेकॉर्ड केला जातो. परंतु आजच्या शंभराव्या भागाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. आज, पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा 100 वा भाग ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रसारित केला जाईल. 'मन की बात'चा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाला होता. तेव्हापासून हा रेडिओ कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केला जातो.


लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी


'मन की बात'चा 100 वा भाग संस्मरणीय करण्यासाठी भाजप आणि सरकारने रोडमॅप तयार केला आहे. तो यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या वतीने सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मन की बातचे प्रसारण ऐकण्यासाठी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांनी विशेष व्यवस्था केली आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा समावेश करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सर्वसामान्यांपासून ते जाणकारांपर्यंत सर्वांची उपस्थिती असावी, अशी सूचना देण्यात आली आहे.


भारतातील राजभवनांमध्ये होणार थेट प्रक्षेपण


पंतप्रधान मोदींच्या मन की बातच्या शंभराव्या भागाचं देशातील राजभवनांमध्येही थेट प्रक्षेपण होणार आहे. मुंबईत राजभवनात होणाऱ्या 100 व्या भागाच्या प्रक्षेपण कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि 'मन की बात' मध्ये उल्लेख झालेल्या व्यक्ती उपस्थित राहणार आहे. यामध्ये पद्म पुरस्कार विजेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योग समुदाय आणि चित्रपट उद्योगातील नामवंतांचा समावेश आहे. तर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पीयूष गोयल मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणांहून 'मन की बात'चं थेट प्रक्षेपण पाहणार आहेत. 'मन की बात'च्या 100 व्या भागाचा सोहळा साजरा करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया आणि देशभरातील विशेष महत्त्वाच्या 12 स्मारकस्थळांवर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून मोठ्या पडद्यांवर प्रक्षेपण केलं जाणार आहे. 


भाजपचं आजचं टार्गेट


भाजपच्या सर्व लोकसभा खासदारांना आपापल्या मतदारसंघातील निवडक ठिकाणी नागरिकांसह हे प्रसारण ऐकण्यास सांगण्यात आले आहे.


एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी ऐकण्याचा रेकॉर्ड बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.


सर्व खासदार सुमारे 1000 लोकांसह हे विशेष प्रसारण ऐकतील.


पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीने देशभरात 2150 ठिकाणी हे प्रसारण ऐकण्याची व्यवस्था केली आहे.


4 ते 5 लाख लोकांना जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात


दरम्यान भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, "देशभरात 4 लाख ठिकाणी मन की बात आणि माझ्या मतदारसंघातील पटना साहिब लोकसभेत 600 हून अधिक ठिकाणी सामान्य जनता, कार्यकर्ते आणि जाणकार मन की बातच्या 100 व्या भागाचे साक्षीदार होतील."


'या' भागांना विशेष पसंती


सेल्फी विथ डॉटर, देशी खेळण्यांना प्रोत्साहन आणि कोविडकाळत पंतप्रधानांनी केलेले आवाहन हे भाग आतापर्यंत झालेल्या प्रसारणात खूप यशस्वी ठरले आहेत. इतकंच नाहीतर पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' हा कार्यक्रम सुरु केल्यापासून देशात रेडिओ ऐकणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.