Twitter Employees Toilet Paper : ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना (Twitter Employees) घरून कामावर येताना टॉयलेट पेपर (Toilet Paper) आणायला सांगितले आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यापासून ते त्यांच्या अनेक निर्णयांमुळे प्रचंड चर्चेत आहेत. मस्क यांनी ट्विटरचा ताबा मिळताच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. शिवाय कंपनी आणि ट्विटर प्लॅटफॉर्ममध्येही अनेक मोठे बदल केले. त्यानंतर ट्विटरमधील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले होते. आताही ट्विटरच्या ऑफिसमधील वातावरण सुधारलेले नाही.


बाथरुममध्ये आता टॉयलेट पेपरही नाही


एका रिपोर्टनुसार, ट्विटरच्या कार्यालयाची अवस्था सध्या फार वाईट झाली आहे. येथील शौचालय अस्वच्छ असून त्यातून दुर्गंधी पसरली आहे. कर्मचाऱ्यांना टॉयलेट पेपरही घरून आणण्यासाठी सांगण्यात आले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिल्यानंतर कंपनीवर आता अशी परिस्थिती आली आहे की, तेथील बाथरुममध्ये आता टॉयलेट पेपरही उपलब्ध नाही. 


साफसफाई कामगार, सुरक्षा रक्षकांना कामावरून काढले


न्यूयॉर्क टाईम्सच्या (New York Times) रिपोर्टनुसार, ट्विटरने साफसफाई कामगारांनाही कामावरून काढून टाकले आहे. सफाई कामगारांनी पगार वाढवण्यासाठी संप केला होता, यामुळे मस्क यांनी सफाई कर्मचाऱ्यांचीही हकालपट्टी केली आहे. इतकेच नाही तर ऑफिसमधील सिक्युरिटी सर्व्हिस म्हणजे सुरक्षा व्यवस्थेचाही बोजवारा उडाला आहे. ट्विटरने सुरक्षा रक्षकांनाही कामावरून कमी केले आहे. त्यामुळे आता ट्विटरच्या ऑफिसमध्ये सुरक्षा व्यवस्थाही नाही.


सफाई कर्मचारी नसल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांची अडचण


साफ करण्यासाठी सफाई कर्मचारी नसल्यामुळे ऑफिसमधील शौचालये अस्वच्छ आहेत. शौचालयातून दुर्गंधी येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलेल्या अहवालात म्हटले आहे की, ट्विटरच्या ऑफिसमध्ये उरलेल्या अन्नाचा आणि शौचालयाची दुर्गंधी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. सफाई कर्मचारी आणि सप्लायर्सही नसल्यामुळे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांनाच टॉयलेट पेपर आणावा लागत आहे.


अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू


दुसऱ्या एका अहवालानुसार, कर्मचाऱ्यांना दोन मजल्यांवर हलवण्यात आले आहे तर, इतर चार मजले बंद करण्यात आले आहेत. याशिवाय ट्विटरने आपले न्यूऑर्कमधील ऑफिस असलेल्या सिएटल इमारतीचे भाडे देणे बंद केले आहे, त्यामुळे बहुतेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) म्हणजे घरून काम करण्यास सांगितले आहे.


ट्विटरचे ऑफिस आता फक्त न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असेल, असेही या अहवालात म्हटले आहे. मस्क यांनी त्यांच्या न्यूयॉर्कच्या कार्यालयांमधून सफाई कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना काढून टाकले आहे. ट्विटरने टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpeceX) या मस्क यांच्या मालकीच्या इतर कंपन्यांमधून अनेक नवीन कर्मचारी नियुक्त केले आहेत.