तेहरान : प्रायव्हेट तुर्किश विमान इराणमध्ये कोसळून 11 महिलांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये इराणमधील तरुण उद्योजिका मिना बसरानसह तिच्या सात मैत्रिणींचा समावेश आहे. मिनाच्या बॅचलर पार्टीनिमित्त या सर्व तरुणी दुबईला गेल्या होत्या.


आघाडीचे तुर्किश बिझनेसमन हुसेन बसरान यांची कन्या मिना ही सात मैत्रिणींसह आपल्या बॅचलर पार्टीसाठी यूएईला गेली होती. गेले अनेक दिवस त्यांनी यूएईमध्ये मजा-मस्तीत घालवले होते. मिनाने सेलिब्रेशनचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

शारजाहून इस्तांबुलला परत येताना इराणच्या दक्षिण भागात हे विमान कोसळलं. विमान अपघात होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमानात आठ प्रवासी आणि तीन केबिन क्रू होते. दोन्ही पायलट आणि केबिन क्रू महिला होत्या.

बम्बार्डिअर चॅलेंजर 604 प्रायव्हेट प्लेन हे हुसेन बसरान यांच्याच कंपनीच्या मालकीचं असल्याचं अनेक तुर्किश टीव्ही वाहिन्यांनी म्हटलं आहे. बसरान यांची कंपनी ऊर्जा, बांधकाम आणि पर्यटन व्यवसायात आघाडीवर असून त्यांच्या मालकीची अनेक हॉटेल्स आहेत. 28 वर्षांची मिना 2013 मध्येच वडिलांच्या कंपनी बोर्ड मेंबर होती.

इराणमधील दुर्गम डोंगराळ भागात हे विमान अपघातग्रस्त झालं. हवामान खराब असल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तेहरानपासून 400 किमी दक्षिणेला शहर-ए-कोर्द भागात विमान क्रॅश झालं.