पोर्ट लुई/ मॉरिशस : महिलांसाठी शॉपिंग ही सर्वात आवडीची गोष्ट. पण याच शॉपिंगमुळे मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींना आपलं पद गमवावं लागणार आहे. पुढील आठवड्यात त्या आपला राजीनामा सादर करतील.

मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्रपती अमीना गुरीब फकीम यांनी शॉपिंगसाठी एका स्वयंसेवी संस्थेच्या क्रेडिट कार्डवरुन शॉपिंग केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सरकारने त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधान प्रविंद जुगनॉथ यांनी दिली.

केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका असलेल्या अमिना गुरीब फकीम यांनी 2015 मध्ये मॉरिशसच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या. पण सध्या त्यांच्यावर शॉपिंगसाठी स्वयंसेवी संस्थेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्याचा आरोप सुरु आहे.

स्थानिक वृत्तपत्राच्या दाव्यानुसार काही दिवसांपूर्वी अमीना गुरीब फकीम इटली आणि दुबईच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी लाखो रुपयाची शॉपिंग केली. त्यांची ही शॉपिंग ड्यूटी फ्री असून, त्याचे पेमेंट करण्यासाठी प्लॅनेट अर्थ इन्स्टिट्यूट या स्वयंसेवी संस्थेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, अमीना गुरीब फकीम यांनी हा आरोप फेटाळला आहे.