तुलसी गबार्ड अमेरिकेच्या पहिल्या हिंदू अध्यक्षा ठरणार?
एबीपी माझा वेब टीम | 12 Nov 2018 08:21 PM (IST)
हवाई मतदारसंघातून चारवेळा सातत्याने निवडून आलेल्या तुलसी गबार्ड यांना डेमोक्रॅटिक पक्षातही मानाचे स्थान आहे.

मुंबई : यूएसए अर्थात अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लॉस एंजलेसमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सत्ताधारी रिपब्लिकन पक्षातील भारतीय वंशाचे नेते संपत शिवांगी यांनी तुलसी गबार्ड यांची ओळख करुन देताना वापरलेले शब्द सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. तुलसी गबार्ड 2020 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षा असू शकतात, असं संपत म्हणताच उपस्थित प्रेक्षक आदराने उभे राहिले. गबार्ड समर्थक आता भारतीय वंशाच्या अमेरिकन मतदारांशी पहिल्या फेरीत संपर्क साधत असल्याची माहिती आहे. हवाई मतदारसंघातून चारवेळा सातत्याने निवडून आलेल्या तुलसी गबार्ड यांना डेमोक्रॅटिक पक्षातही मानाचे स्थान आहे. गेल्याच आठवड्यात त्या अमेरिकन प्रतिनिधीसभेत चौथ्यांदा निवडून गेल्या. डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली तर त्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या पहिल्या हिंदू उमेदवार असतील. तसंच निवडून गेल्या तर पहिल्या महिला आणि सर्वात तरुण अध्यक्षाही असतील. पुढच्या अध्यक्षपदासाठीच्या घोषणेविषयी त्यांनी आपल्या भाषणात मौनच बाळगले. अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चांना त्यांनी दुजोरा दिला नसला तरी इन्कारही केलेला नाही. तुलसी गबार्ड हिंदू असल्या तरी भारतीय नाहीत. त्यांचा जन्म हवाईमधून सिनेटर असणारे कॅथलिक वडील आणि कॉकेशियन समुदायाची आई अशा मिश्र दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. तुलसी यांनीही किशोरावस्थेतच हिंदू धर्म स्वीकारला.