Donald Trump On Twitter : ट्विटर (Twitter) कंपनीची मालकी मिळताच एलॉन मस्क (Elon Musk) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मस्क यांनी अमेरिकेचा माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावरील ट्विटरची बंदी हटवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विटरवर घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर व्हाईट हाऊस (White House) परिसरात पसरलेल्या हिंसा भडकवल्याचा आरोप करत ट्विटरने ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर (Twitter Account) बंदी घातली होती.


ट्विटरने ट्रम्प यांच्यावर बंदी घातली होती


अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या (US President) निवडणुकीनंतर 6 जानेवारी रोजी अमेरिकेत भडकलेल्या हिंसेसाठी माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) दोषी असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यानंतर हिंसाचार भडकवल्याच्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी घालण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर 88 मिलियन फॉलोअर्स होते. त्यानंतर आता मस्क यांनी ट्रम्प यांच्यावरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.


मस्क यांनी ट्रम्प यांच्यावरील बंदी उठवण्याची केली होती घोषणा


एलॉन मस्क यांनी याआधीही ट्रम्प यांच्यावरील बंदी उठवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. मस्क यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ट्विटरची मालकी मिळाल्यावर ट्रम्प यांच्यावरील बंदी हटवण्यात येईल. मे महिन्यामध्ये एका कार्यक्रमात मस्क यांनी हे वक्तव्य केलं होतं. मस्क यांनी एप्रिल महिन्यात ट्विटर खरेदी करण्याचं ठरवत मोठी घोषणा केली होती. तेव्हा पासून ट्विटर डील चर्चेत होती.


एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक


अखेरीस एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक बनले आहेत. मस्क यांनी सुरुवातीला ठरलेल्या किमतींतच म्हणजे 44 अब्ज डॉलर्स किमतीला ट्विटर कंपनी खरेदी केली आहे. येत्या काळात या डीलची कागदपत्रांचं काम पूर्ण होईल. ट्विटरची मालकी मिळाल्यावर मस्क आता अनेक मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.


ट्विटरच्या तीन बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी


एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter Deal) खरेदी केल्यानंतर पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांच्यासह तीन बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. ट्विटरचा बहुचर्चित ठरलेला करार अखेर पूर्ण झाला आहे. ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी मोठे बदल केले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ (CEO - Chief Executive Officer) पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली आहे. इतकंच नाही तर सीएफओ (CFO - Chief Financial Office) नेड सेगल (Ned Segal) यांनाही कामावरून कमी करत, या दोघांना कंपनीच्या मुख्य कार्यालयातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.