इस्लामाबाद : पाकिस्तानची अर्थव्यवस्था येत्या 10 वर्षात पूर्णपणे उध्वस्त होणार असून ग्रीससारखी अवस्था होणार आहे, असं खुद्द पाकिस्तानचे शिक्षण मंत्री मेहताब हुसेन यांनीच म्हटलं आहे. देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक विषमता आहे, याला संपवणं गरजेचं आहे, असंही हुसेन यांनी म्हटलं आहे. 'एक्स्प्रेस ट्रिब्युन'च्या वृत्तानुसार 'इंटरनॅशनल कॉन्‍फरन्स ऑन ट्रांसफॉर्मिंग इकोनॉमिक डेव्हलपमेंट'मध्ये हुसेन यांनी हे संकेत दिले. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे ग्रीसच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे हाल होतील. पाकिस्तानमधील आर्थिक विषमता याला कारणीभूत ठरणार आहे. कारण सर्व समाज श्रीमंत गरीब, असा विभागला गेला आहे, अशी खंत पाकिस्तानमधील सामाजिक परिस्थितीवर हुसेन यांनी व्यक्त केली. इतर देशांच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे पाकिस्तानला विकास साधायचा असेल तर परिस्थितीनुसार बदल स्वीकारावा लागेल, असं हुसेन म्हणाले. पाकिस्तानसमोर गरीबी, बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्टाचार आणि प्रशासन अशी अनेक आव्हानं आहेत. त्यामुळे विकासावर त्याचा परिणाम होत आहे, असंही हुसेन यांनी सांगितलं.