कैरो : इजिप्तमध्ये राहणाऱ्या एका पतीने पत्नीच्या कॅन्सरच्या उपचारांसाठी सर्वस्व विकलं. फ्रान्समध्ये कर्करोगावरील शस्त्रक्रिया यशस्वी करुन जोडपं विमानाने परत येत होतं, मात्र दुर्दैवाचे दशावतार म्हणा किंवा काही, 'त्या' विमान अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि त्यांची तीन मुलं पोरकी झाली.

 
गुरुवारी पॅरिसहून कैरोला येणाऱ्या इजिप्तएअरच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात प्रवास करणारे सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याचं वृत्त आलं. अहमद अॅशरी आणि त्याची पत्नी रहम हे याच 66 जणांपैकी. 31 वर्षांच्या अहमदने पत्नीला कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून वाचवण्यासाठी गाडी आणि राहतं घर विकलं.

 
अहमद-रहमच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती. त्यांचा मोठा मुलगा प्राथमिक शाळेत शिकतो, तर धाकट्या जुळ्या मुली आहेत. कॅन्सरवरील शस्त्रक्रियेसाठी दोघे पॅरिसला रवाना झाले. महिनाभर चालणाऱ्या या ट्रीटमेंटसाठी पोटच्या तिन्ही पोरांना त्यांनी आईकडे ठेवलं.

 
सोमवारी त्यांनी आईला फोन करुन आपण परत येत असल्याचं कळवलं. बुधवारी रात्री त्यांचं विमान आकाशात उडालं आणि त्यांची स्वप्नं हवेतच विरुन गेली.


56 प्रवासी आणि 10 केबिन क्रू सह पॅरिसहून कैरोला जाणारं इजिप्तएअरचं विमान गुरुवारी क्रॅश झालं होतं. इजिप्तएअर फ्लाईट क्रमांक MS804 रडारवरुन बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली होती. भूमध्य सागरात विमान कोसळलं असून त्याच्या अवशेषांचा शोध सुरु आहे. विमान कोसळण्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून तांत्रिक कारणांसोबतच दहशतवादी हल्ल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

 

संबंधित बातम्या :


कैरोला जाणारं इजिप्तएअरचं विमान क्रॅश