पुरुष गोंधळ घालतात आणि बायकांना सगळं निस्तरावं लागतं! विनोदाचा भाग सोडा, पण ब्रिटनचं चित्र सध्या तसंच दिसतं आहे.
ब्रिटनच्या जनतेनं ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिल्यावर डेव्हिड कॅमरॉन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर सत्ताधारी हुजूर पक्षात नव्या नेतृत्त्वासाठी निवड प्रक्रिया सुरू असून, त्यात आता केवळ दोनच उमेदवार उरल्या आहेत. तेरेसा मे (59 वर्ष) आणि अँड्रिया लीडसॉम (53 वर्ष).
अँड्रिया लीडसॉम
दोघींपैकी कुणीही जिंकलं, तरी ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारी दुसरीच महिला ठरेल. १९७९ ते १९९० या कालावधीत मार्गारेट थॅचर यांनी ब्रिटनचं पंतप्रधानपद सांभाळलं होतं. सध्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी तेरेसा मे यांचंच नाव आघाडीवर आहे.
तेरेसा मे यांनी कॅमरॉन सरकारमध्ये गृहमंत्रीपद सांभाळलं होतं. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँक ऑफ इंग्लंडसाठी काम करायच्या. मे यांचा युरोपियन युनियनला पाठिंबा होता मात्र जनतेनं ब्रेक्झिटचा कौल दिला असून त्याचा आदर राखला पाहिजे असं त्यांना वाटतं. अतिशय कणखर व्यक्तीमत्व अशी मे यांची ओळख असून कुणी त्यांना ब्रिटनच्या अँगेला मर्कलही म्हणतं.