पीटरमारित्झबर्ग: इतिहासाची पाने चाळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्याच स्टेशनवर पोहोचले. जिथे महात्मा गांधींना ट्रेनमधून अपमानास्पदरितीने बाहेर काढण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतील गांधींची ट्रेनमधून प्रवास करून त्यांना आदरांजली वाहिली.


 

दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रीक स्थानकाला भेट दिली. येथून त्यांनी गांधीजींच्या वर्णभेदाच्या लढ्याला ज्या ट्रेनमधून सुरुवात झाली, त्या पीटरमारित्झबर्गपर्यंतचा ट्रेनने प्रवास केला.

 

7 जून 1893 साली जेव्हा महात्मा गांधी डरबनहून प्रीटोरीयाला जात होते. तेव्हा त्यांना एका गोऱ्या अधिकाऱ्याने प्रथम श्रेणीतील बोगीत चढण्यात मनाई केली, व तृतीय श्रेणीच्या बोगीतून प्रवास करण्यास सांगितले. गांधीजींकडे प्रथम श्रेणीच्या बोगीचे तिकीट असल्याने त्यांनी तृतीय श्रेणीच्या बोगीतून प्रवास करण्यास नकार दिला. त्यानंतर कडाक्याच्या थंडीत पीटरमारित्झबर्ग स्टेशनवर उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाच्या विरोधात संघर्ष देण्यास सुरुवात केली.


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्या स्टेशनवर गेले ज्या स्टेशनवर त्यांना अपमानास्पद पद्धतीने उतरवण्यात आले होते. तसेच त्यांनी गांधीजींचे वास्तव्य राहिलेल्या फोनिक्स या वस्तीलाही भेट दिली.

 

पंतप्रधान कार्यालयाने नरेंद्र मोदींच्या या यात्रेची माहिती देणारे ट्विट केले आहे. उद्या राष्ट्रपती जॅकब जुमा यांच्या सोबतच्या चर्चेनंतर ते नेल्सन मंडेला आणि महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहेत.