नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर भोवती कारवाईचे फास आवळायला आता सुरुवात झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता पाकिस्तान सरकारनं मसूदची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान सरकारनं तशी अधिसूचना जारी केली आहे. इतकंच नाही तर मसूद अझहरवर प्रवासबंदीही लागू करण्यात आली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतानं मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरु केले होते. मात्र चीनने नकाराधिकाराचा वापर करुन भारताच्या प्रयत्नात खोडा घातला होता.

अखेर अमेरिका, फ्रान्स आणि यूकेच्या प्रस्तावाला चीनने पाठिंबा दिल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं. त्यामुळे मसूद विरोधात लावलेल्या निर्बंधाच्या अंमलबजावणीचे आदेश पाकिस्तानने आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.



मसूद अझहरला दुसरा मोठा झटका, पाकिस्तानमध्येही मसूदला बंदी

भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशवादी घोषित केल्यानंतर काल त्याला दुसरा मोठा झटका बसला. पाकिस्तानमध्येही मसूदला बंदी घालण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आदेशानंतर पाकिस्तानकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशवादी घोषित केलं आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबतची माहिती दिली होती. संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अझहरचा समावेश केला आहे. पुलवाला हल्ला आणि भारतविरोधी अनेक कारवायामध्ये मसूद अझहरची महत्त्वाची भूमिका आहे. मसूद अझहरला चीनचं नेहमीच समर्थन मिळत होतं, मात्र यावेळी चीनने नरमाईची भूमिका घेतली.

दहा वर्षांच्या प्रयत्नानंतर यश
अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतावादी घोषित करण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून नुकतेच देण्यात आले होते. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यासाठी भारतासह इतर काही देशांनी चारवेळा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा 2009 मध्ये भारतानेच प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर 2016 मध्ये पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने अमेरिका, इंग्लंड, फ्रांससह प्रस्ताव सादर केला होता. 2017 मध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रांस या देशांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. मार्च 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांनी पुन्हा एकदा प्रस्ताव सादर केला. अखेर आज मसूद अजहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांची परिणीती : भाजप
दरम्यान, मसूद अजहरला संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे, ही पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांची परिणीती आहे, असा दावा भाजपने केला आहे. पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीनं दहशतवाद्यांना आसरा मिळतोय, हे मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना सातत्यानं पटवून दिलं. त्यामुळे मोदींच्या मुत्सद्देगिरीचा हा विजय असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.