इजिप्तमध्ये बसवर दहशतवादी हल्ला, 23 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 27 May 2017 07:48 AM (IST)
मिन्या (इजिप्त) : इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन लोकांना घेऊन जाणाऱ्या एका बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. यात तब्बल 23 लोकांचा मृत्यू झाला असून 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समजते आहे. दक्षिण काहिरापासून 250 किमीवर असणाऱ्या मिन्या प्रांतात हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. कॉप्टिक ख्रिश्चन लोकांना घेऊन जाणाऱ्या बसवर हा हल्ला झाला आहे. याआधी सुद्धा कॉप्टिक बसवर अशा प्रकारचे हल्ले करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 8 ते 10 हल्लेखोर होते ज्यांनी इजिप्तमधील लष्कराचे कपडे परिधान केले होते. अद्याप तरी या हल्ल्याची कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारलेली नाही. इजिप्तमध्ये 9 एप्रिल रोजी आयसिसच्या दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात 45 जणांचा मृत्यू झाला होता तर 119 जण जखमी झाले होते.