Taliban News: अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या अधिकारांचा आदर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही दिवसांनी तालिबानच्या अधिकाऱ्यांनी हेरात प्रांतातील सरकारी आणि खाजगी विद्यापीठांमध्ये मुला-मुलींना एकत्र शिकण्यास बंदी घातली आहे. सोबतच या गोष्टीला समाजातील सर्व वाईट गोष्टींचे मूळ म्हटलं आहे. खामा प्रेस या वृत्तसंस्थेने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार, विद्यापीठातील प्राध्यापक, खाजगी संस्थांचे मालक आणि तालिबान अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानात अचानक सत्ता काबीज केल्यानंतर तालिबानचा हा पहिला 'फतवा' आहे.


तालिबानचे प्रदीर्घ काळ प्रवक्ते असलेले जबीहुल्ला मुजाहिद मंगळवारी पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी दिसले आणि त्यांनी वचन दिले की तालिबान इस्लामिक कायद्यानुसार महिलांच्या अधिकारांचा आदर करेल. विद्यापीठाचे प्राध्यापक आणि खाजगी शैक्षणिक संस्थांचे मालक यांच्यासोबत तीन तास चाललेल्या बैठकीत तालिबानचे प्रतिनिधी आणि अफगाणिस्तानचे उच्च शिक्षण प्रमुख मुल्ला फरीद म्हणाले की, यावर कोणताही पर्याय नाही, आता मुला-मुलींनी सोबत शिक्षण घेणं संपवलं पाहिजे. ते असेही म्हणाले की, महिला शिक्षकांना केवळ महिला विद्यार्थ्यांना शिकवण्याची परवानगी असेल, पुरुष विद्यार्थ्यांना नाही. फरीदने सहशिक्षणाचे वर्णन 'समाजातील सर्व वाईटाचे मूळ' असे केले.


शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले की या निर्णयाचा सरकारी विद्यापीठांवर परिणाम होणार नाही. परंतु, खासगी संस्थांना संघर्ष करावा लागेल, जे आधीच महिला विद्यार्थ्यांच्या कमतरतेशी लढत आहेत. अधिकृत अंदाजानुसार, हेरातमध्ये खाजगी आणि सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये 40,000 विद्यार्थी आणि 2,000 व्याख्याते आहेत.


काबूल विमानतळावर ताब्यात घेतलेले भारतीय मुक्त
प्रवाशांच्या कागदपत्रांची चौकशी आणि पडताळणीसाठी शनिवारी काबूल विमानतळाजवळील भारतीयांच्या एका गटाला अडवण्यात आले आणि अज्ञात ठिकाणी नेण्यात आल्यानंतर भारतात गोंधळ आणि चिंता पसरली. मात्र, या भारतीयांना सोडण्यात आल्याचे नंतर उघड झाले. काबूलमधील बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या लोकांनी सांगितले की, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीयांना नुकसान झाल्याचे वृत्त नाही.


अफगाण माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, हे भारतीय त्या 150 लोकांमध्ये होते जे काबुल विमानतळाकडे जात असताना त्यांना तालिबान्यांनी रोखलं होतं. काबुल नाऊ न्यूज पोर्टलने आधी कळवले होते की, या गटाचे तालिबान्यांनी अपहरण केले होते. पण, नंतर बातमी अपडेट केली, की सर्व लोकांना सोडण्यात आले असून ते काबूल विमानतळाकडे जात आहेत. काबूलमधील बदलती परिस्थिती पाहणाऱ्या लोकांनी सांगितले की, भारतीयांना चौकशीसाठी नेण्यात आले होते आणि सध्याच्या परिस्थितीत हे सामान्य आहे.