Afghanistan News: तालिबानने अफगाणिस्तानची दुसरी प्रांतीय राजधानी शेबर्गन शहर ताब्यात घेतले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबान पुन्हा देशात आपले पाय पसरत आहे आणि त्याने अनेक क्षेत्रांवर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हिंसाचार सुरूच आहे.


यापूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी तालिबान्यांनी हल्ला करून अफगाण सरकारच्या राज्य मीडिया केंद्राच्या संचालकाची हत्या केली. अलीकडच्या काळात सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येची ही ताजी घटना आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा काही दिवसांपूर्वीच देशाचे काळजीवाहू संरक्षण मंत्री यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता.


राज्य मीडिया सेंटरच्या संचालकाची हत्या अशा वेळी झाली जेव्हा तालिबान दिवसेंदिवस आपलं क्षेत्र वाढवत आहे. कारण अमेरिका आणि नाटो सैन्याने महिन्याच्या अखेरपर्यंत अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार घेणार आहे. तालिबान अनेक महिन्यांपासून संपूर्ण अफगाणिस्तानात संघर्ष करत आहे आणि छोट्या छोट्या प्रशासकीय जिल्ह्यांचा ताबा घेतल्यानंतर आता प्रांतीय राजधानींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.


दरम्यान, तालिबानने शुक्रवारी दक्षिण निमरोज प्रांताची राजधानी झरंज ताब्यात घेतल्याचे दिसते. हा विजय प्रतिकात्मक असला तरी तो मोठा विजय मानला जात आहे. सरकारने दावा केला आहे की शहराच्या गंभीर पायाभूत सुविधांवर लढाई अजूनही सुरू आहे आणि झरंजचा ताबा अजून गेला नाही. परंतु, तालिबानने सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध केले आहेत, ज्यात तालिबान स्थानिक विमानतळावर आणि शहराच्या प्रवेश बिंदूंवर दिसत आहेत. या प्रांताचे गव्हर्नर अब्दुल करीम बरहवी यांनी झरंज येथून पळून जाऊन शांततापूर्ण चहर बुर्जक जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. जिथे त्यांना स्थानिक वांशिक बलोच लोकांनी संरक्षण दिलं आहे.