न्यूयॉर्क: भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला फटकारलं आहे. काल अकबरुद्दीन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भाषण केलं. यावेळी त्यांनी मसूद अजहरला पाठीशी घालणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना धारेवर धरलं. तसंच जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा वेळदेखील संपला असल्याचं त्यांनी यावेळी ठणकावलं.


संयुक्त राष्ट्रातील 'रिपोर्ट ऑफ सेक्रेटरी जनरल ऑन द वर्क ऑफ द ऑर्गनायझेशन'मध्ये पाकिस्तानच्या यूएनमधील राजदूत महीला लोधी यांनी काश्मीरचा मुद्दा उकरुन काढत, भारतावर टीका केली. त्याला अकबरुद्दीन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

अकबरुद्दीन म्हणाले की, ''काश्मीरप्रश्नी जगाची दिशाभूल करणाऱ्या पाकिस्तानला सर्वत्र मात खावी लागत आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेवेळीही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळीही त्यांना समर्थन मिळाले नाही. त्यामुळे यावर आधिक बोलण्याची गरज नाही.''

त्याचबरोबर त्यांनी सुरक्षा परिषदेलाही धारेवर धरलं. संयुक्त राष्ट्रांना भारत-पाकिस्तानच्या वादात हस्तक्षेप करायला तयार नाही. पण, दहशतवादी मसूद अजहरला क्लिनचीट देण्याची सुरक्षा परिषदेला खूप घाई आहे, असा टोला अकबरुद्दीन यांनी लगावला.

15 देशांच्या सुरक्षा परिषदेत शांती आणि सुरक्षात्मक वातावरण टिकवून ठेवण्याचे काम आहे. पण, सध्या ते काम योग्य रित्या होत नसल्याची टीकाही अकबरुद्दीन यांनी केली.