इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरात भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरुच आहेत. उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही तपास न करता काही तासातच भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं, असं म्हणत पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच टीकास्त्र सोडलं.


बुरहान वाणीला हिरो ठरवण्याचा प्रयत्नही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला. बुरहान हा शांतताप्रिय नेता असल्याचा दावा शरीफ यांनी केला. पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतावर तोफ डागली. आम्ही युद्धाविरोधात आहोत, आम्हाला शांतता हवी आहे. तसंच पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरुन काढत, काश्मीरचा मुद्दा शांततेने सोडवायचा असल्याचं नवाझ शरीफ यांनी म्हटलं आहे.

पाकव्याप्त काश्मीरात भारताने कोणताही सर्जिकल स्ट्राईक केला नसल्याचा पुनरुच्चार पाकिस्तानने केला आहे. सर्जिकल स्ट्राईक हा भारतीय लष्कराचा बनाव असल्यावर पाक ठाम आहे. भारताने वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यामुळेच पाकला दोन जवान गमवावे लागल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही हल्ला केल्याची, तसंच भारताच्या कुठल्याही हल्ल्याला तोंड देण्यास आम्ही समर्थ असल्याची दर्पोक्तीही पाकने केली.