नवी दिल्ली:  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण बैठकीसाठी काल रात्री उशीरा न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्या. सुषमा स्वराज राष्ट्र संघात भारताचं प्रतिनिधित्व करत असून संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारणा बैठकीला संबोधित करणार आहेत.


पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी संयुक्त राष्ट्र संघात काश्मीर मगरीचे अश्रू ढाळताना, संयुक्त राष्ट्र संघासमोर जगाची दिशाभूल केली होती. त्यामुळे सुषमा स्वराज पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या दहशतवादाच्या फॅक्टरीचं सत्य जगासमोर उघडे पाडणार आहेत. इतकेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, रशिया आणि चीन आदी स्थायी सदस्य देशांसमोर पाकिस्ताच्या कुकर्माचे पुरावे सादर करणार आहेत.

उरी हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून जे पुरावे हस्तगत झाले, त्यातून यामागे पाकिस्तानचा या हल्ल्यामागे हात असल्याचे समोर आले. दहशतवाद्यांकडून भारताचा नकाशा, जीपीएस उपकरण आणि पाकिस्तानच्या सैन्य दलाकडून वापरण्यात येणारे मोबाईल सेटही जप्त करण्यात होते. यासंबंधी सर्व माहिती भारताकडून संयुक्त राष्ट्र संघाला देण्यात येईल.

संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी काश्मीरविरोधातील गरळ ओकताना, दहशतवादी बुरहान वानीला याला काश्मीरचा नेता म्हटलं होतं. इतकेच नव्हे, तर भारतीय सैन्य काश्मीरमधील जनतेवर अनन्वित अत्याचार करत असल्याचं सांगून जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.