दहशतवाद पसरवण्यात पाकिस्तान तरबेज आहे, असे सुषमा स्वराज म्हणाल्या. तसेच, 9/11 चा मास्टरमाईंड ठार करण्यात आला, मात्र 26/11 चा मास्टरमाईंड उजळ माथ्याने फिरतोय, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या.
दहशतवाद पसरवण्यात पाकिस्तान तरबेज : सुषमा स्वराज
“आमचा शेजारी देश पाकिस्तान दहशतवाद पसरवण्यात तरबेज आहे. भारतासाठी सर्वात दुख:दायक गोष्ट अशी आहे की, आमच्या शेजारी देशातील दहशतवादच आमच्यासाठी आव्हान बनलंय.”, असे म्हणत स्वराज पुढे म्हणाल्या, “पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगाने आता ओळखला आहे. पाकिस्तानमुळेच दोन्ही देशातील चर्चेत अडथळा येतोय. 26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरतोय.”
दहशतवादी कुरापती सुरु असताना चर्चा शक्य नाही : सुषमा स्वराज
“दोन्ही देशंमध्ये चर्चा व्हावी, यासाठी भारताने सातत्याने प्रयत्न केलेत. मात्र पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापतींच्या वातावरणात दोन देशांमध्ये चर्चा होऊ शकते का? हे शक्य नाही.” हे ठणकावून सांगतानाच सुषमा स्वराज पुढे म्हणाले, “पाकिस्तान दहशतवाद्यांचा फोटो असलेलं टपाल तिकीट छापतं. अशा दहशतवादी कुरापतींकडे किती काळ दुर्लक्ष करणार?”
दरम्यान, यावेळी सुषमा स्वराज यांनी भारत सरकारच्या योजनांबद्दलही माहिती दिली. जनधन योजना, आयुष्मान भारत योजना इत्यादी योजना आणि त्यांचा देशातील नागरिकांना होणारा फायदा, यासंबंधी आकडेवारी आणि माहिती संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावरुन सुषमा स्वराज यांनी सांगितली.