जकार्ता : मध्य इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर पालू आणि दोंगाला शहराला त्सुनामीच्या लाटांनी तडाखा दिला आहे. भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमध्ये जवळपास 400 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जण जखमी आहेत. संपूर्ण परिसरातील बचावकार्य सुरू झालं आहे.


दोंगालापासून 56 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर जमिनीच्या आत भूकंपाचं केंद्र होतं. भूकंपाच्या तीव्रतेमुळे अनेक घरं जमिनदोस्त झाली. जवळपास साडेतीन लाख लोखसंख्या असलेल्या पालू शहराला भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीचा फटका बसला. याठिकाणी 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या.


त्सुनामीनंतर नागरिकांनी उंच ठिकाणांवर जाण्यासाठी धाव घेतली. लवकरात लवकर उंच ठिकाणी पोहोचता यावं यासाठी नागरिकांना गाड्यांची मदत घेतली. त्यामुळे शहराच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.


इंडोनेशियाच्या आपत्तीव्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुलावेसी द्वीपवर आलेल्या भूकंपानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे जवळपास 400 जणांना मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जखमींना दाखल करण्यात येत आहे. या जखमींवर उपचार करणं हे डॉक्टरांसमोर मोठं आव्हान आहे.


इंडोनेशियामध्ये छोटे-मोठे भूकंप नेहमीच होत असतात. डिसेंबर 2004मध्ये इंडोनेशियाच्या सुमात्रामध्ये 9.3 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. या भूकंपानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीचा अनेक देशांना फटका बसला होता.


यामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जीवितहानी झाली होती. या त्सुनामीमध्ये हिंद महासागरातील क्षेत्रातील देशांमध्ये जवळपास 2,20,000 लोकांचा मृत्यू झाला होता.