इस्लामाबाद : भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान हादरलं आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे प्रमुख रिझवान अख्तर यांना पदावरुन हटवण्यात येणार असल्याचं वृत्त, 'द नेशन' या वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.


रिझवान अख्तर यांची सप्टेंबर 2014 मध्ये इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआयएसच्या संचालकपदी नियुक्त झाली होती. त्यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये पदभार स्वीकारला होता. लेफ्टनंट जनरल जहीर उल इस्लाम यांच्या जागी अख्तर यांची नेमणूक झाली होती.

सामान्यत: आयएसआयच्या संचालकाची नियुक्ती तीन वर्षांसाठी असते. आयएसआयप्रमुख सेवानिवृत्त होईल किंवा लष्करप्रमुख त्यांची जागा घेईल, तेव्हाच त्यात बदल होतात. पण तीन वर्षांच्या आतच रिझवान अख्तर यांना हटवण्याची हालचाली सुरु झाल्याचं कळतं.

वृत्तात लिहिलं आहे की, आयएसआय संचालकपदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळाच्या आधीच रिझवान अख्तर यांना हटवलं जाऊ शकतं. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, कराची पलटनचे कमांडर लेफ्टनंट जनरल नवीद मुख्तार त्यांची जागा घेऊ शकतात. मात्र आयएसआयमधील या बदलाला अजून औपचारिक दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, पाकिस्तान लष्कराते मुख्य प्रवक्ते लेफ्टिनंट जनरल असीम सलीम बाजवा यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे.