Afghanistan Bomb Blast:  अफगाणिस्तानमधील सत्तासंघर्ष एकीकडे थांबायचं नाव घेत नसताना दहशतवादी कारवायांचं सावट देखील पिच्छा सोडायला तयार नाही. काल पुन्हा एकदा अफगाणिस्तान बॉम्बस्फोटानं हादरुन गेलं.  अफगाणिस्तानमधील कुंदुज येथील शिया मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला. कुंदुजमधील मशिदीत झालेल्या स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या बॉम्बस्फोटाची जबाबदारी दहशतवादी संघटना ISIS ने  स्वीकारली आहे. टेलिग्राम चॅनलवरुन ISIS ने असे सांगितले आहे की, 'कुंदुज शहरातील मशिदीमध्ये गर्दी असताना स्फोटक असलेले वस्त्र तिथे ठेवण्यात आले होते'.  ISIS ही संघटना तालिबानची कट्टर प्रतिस्पर्धी असून त्यांच्याकडून अफगाणिस्तानमध्ये सांप्रदायिक दंगे भडकवण्यासाठी शिया मुस्लिमांवर वारंवार हल्ला करण्याचे प्रकार घडत आहेत. 


माहिती आणि संस्कृती उपमंत्री जबीउल्लाह मुजाहिद यांनी तुलू न्यूजला स्फोटाची पुष्टी केली होती. ते म्हणाले होते की "आज दुपारी कुंदुजच्या खानाबाद बंदर भागात एका शिया मशिदीला लक्ष्य करण्यात आले. यात आपल्या देशातील अनेक लोक शहीद झाले आणि अनेक जखमी झाले.'


 हल्ल्यावेळी 300 पेक्षा जास्त लोक करत होते नमाज पठण 
स्फोट झाला तेव्हा 300 पेक्षा जास्त लोक मशिदीत नमाजसाठी जमले होते, असे स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तुलु न्यूजनुसार, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की या बॉम्बस्फोटात 100 हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि जखमी झाले आहेत. मात्र अद्याप मृतकांचा निश्चित आकडा कळू शकलेला नाही.


Afghanistan Bomb Blast: अफगाणिस्तानच्या कुंदुझमध्ये शुक्रवारच्या नमाजदरम्यान मशिदीत बॉम्बस्फोट, किमान 50 जण ठार



अलीकडेच काबूलमधील मशिदीत स्फोट झाला होता
अलीकडेच काबूलमधील ईदगाह मशिदीला लक्ष्य करून बॉम्बस्फोट करण्यात आला होता. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांच्या आईच्या स्मरणार्थ मशिदीत नमाज आयोजित करण्यात येत होती. मुजाहिदने नंतर ट्विट करून दावा केला की या हल्ल्यात अनेक नागरिक मारले गेले. तालिबानचे प्रवक्ते बिलाल कारी यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, या हल्ल्यात तालिबानी समर्थकांना कुठलीही इजा झाली नाही. हल्ल्यात मरण पावलेले नागरिक मशिदीच्या दाराबाहेर उभे होते, अशी माहिती देण्यात आली होती.