Afghanistan Bomb Blast: अफगाणिस्तानमधील कुंदुज येथील शिया मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. कुंदुजमधील मशिदीत झालेल्या स्फोटात किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने हॉस्पिटलच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. अलीकडेच काबूलमधील मशिदीच्या दारावर बॉम्बस्फोट झाला होता, ज्यामध्ये किमान पाच अफगाण नागरिक मारले गेले होते. दरम्यान, इस्लामिक स्टेट गटाने अफगाणिस्तानात मशिदीवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारली नाही.


अफगाणिस्तानच्या तुलू न्यूजने कळवले आहे की, हा स्फोट कुंदुजच्या सय्यद आबाद भागात झाला. हा स्फोट शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान झाला. माहिती आणि संस्कृती उपमंत्री जबीउल्लाह मुजाहिद यांनी तुलू न्यूजला स्फोटाची पुष्टी केली. ते म्हणाले, की "आज दुपारी कुंदुजच्या खानाबाद बंदर भागात एका शिया मशिदीला लक्ष्य करण्यात आले. यात आपल्या देशातील अनेक लोक शहीद झाले आणि अनेक जखमी झाले."






300 पेक्षा जास्त लोक नमाज पठण करत होते
स्फोट झाला तेव्हा 300 पेक्षा जास्त लोक मशिदीत नमाजसाठी जमले होते, असे स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तुलु न्यूजनुसार, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की या बॉम्बस्फोटात 100 हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि जखमी झाले आहेत.


अलीकडेच काबूलमधील मशिदीत स्फोट झाला होता
अलीकडेच काबूलमधील ईदगाह मशिदीला लक्ष्य करून बॉम्बस्फोट करण्यात आला होता. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांच्या आईच्या स्मरणार्थ मशिदीत नमाज आयोजित करण्यात येत होती. मुजाहिदने नंतर ट्विट करून दावा केला की या हल्ल्यात अनेक नागरिक मारले गेले. तालिबानचे प्रवक्ते बिलाल कारी यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, या हल्ल्यात तालिबान लढाऊंना इजा झाली नाही. हल्ल्यात ठार झालेले नागरिक मशिदीच्या दाराबाहेर उभे होते.