अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 22 Apr 2018 05:47 PM (IST)
येत्या 20 ऑक्टोबरला काबुलमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची स्थिती चिंताजनक झाली आहे.
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आज आत्मघाती हल्ला झाला. यात 31 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले आहेत. काबुलमधील मतदान नोंदणीकरण केंद्राबाहेर हा स्फोट घडवून आणला गेला. 14 एप्रिलपासून काबुलमध्ये निवडणुकांसाठी मतदान नोंदणी प्रक्रिया सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवरच हा स्फोट घडवून आणल्याचा अंदाज आहे. येत्या 20 ऑक्टोबरला काबुलमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची स्थिती चिंताजनक झाली आहे. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, काबुलचे पोलिस प्रमुख दाऊद अमीन यांनी सांगितले की, मतदान नोंदणीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच स्फोट झाला. हा आत्मघाती हल्ला होता. या आत्मघाती हल्ल्यात आपला जीव गमावलेल्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.