आजपासून उत्तर कोरिया आण्विक आणि दूरक्षेत्रात हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी रोखणार आहे, असं उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियात म्हटलं आहे.
इतकंच नाही तर किम जोंगने आण्विक साइटही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
किम जोंगच्या या निर्णयाचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केलं आहे.
येत्या मे किंवा जून महिन्यात किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन नेत्यांची भेट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं महत्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, किम जोंगने आता देशाची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय मुद्द्यांकडे लक्ष देण्याचं ठरवलं आहे.
ट्रम्प यांचं ट्विट
किम जोंगच्या या निर्णयाचं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन स्वागत केलं.
“उत्तर कोरिया अणू चाचणी कार्यक्रम रोखण्यास तयार झाला आहे. हे उत्तर कोरिया आणि जगभरासाठी चांगली बाब आहे”, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
किम जोंगने गेल्या काही दिवसात अणू चाचण्या करुन जगभरात खळबळ उडवून दिली आहे. काही केल्या तरी तो कोणालाही दबत नव्हता. किम जोंगवर अनेकवेळा आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याच्या अणूचाचण्या कायम होत्या.
मात्र आता त्याने यापुढे अणूचाचण्या न करण्याचा निर्णय घेतला आहे.
किम जोंग 2011 मध्ये सत्तेवर आल्यापासून पहिल्यांदाच देशाबाहेर गेला होता. काही दिवसांपूर्वीच त्याने चीनमध्ये जाऊन राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली होती.