China Economics :  रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई आणि इतर कारणांमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था चीनवरदेखील संकट घोंघावू लागले आहे. कोरोनाच्या सावटामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील 15 दिवसांपासून चीनच्या शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. 


एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या अर्थव्यवस्थेवरही मंदीचे सावट दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन लागू केल्यास अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनच्या शेअर बाजारात मागील 15 दिवसांपासून मोठी घसरण सुरू आहे. 


चीन शेअर बाजारातील निर्देशांक Hang Seng China Enterprise Index मध्ये 28 जून पासून घसरण सुरू आहे. 28 जूनपासून आतापर्यंत जवळपास 9 टक्क्यांनी शेअर बाजार घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्यास त्याचा परिणाम अर्थचक्रांवर होणार असल्याची भीती आहे. चीनमध्ये कोरोना संसर्गाबाबत मोठी काळजी घेतली आहे. चीनचे स्टील हब असणाऱ्या एका शहरात फक्त एकच कोरोनाबाधित आढळल्यानंतर या शहरात तीन दिवस लॉकडाउन लागू केला. 


चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यास पुन्हा लॉकडाउन लागू होण्याची भीती आहे. यामुळे कारखान्यातील उत्पादन ठप्प होण्याची भीती आहे. तर, बांधकाम क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. चीनमधील आधीच काही कंपन्या दिवाळखोरीत जाण्याची चिन्हं आहेत. 


आर्थिक विकासाला ब्रेक


मागील आठवड्यात चीनच्या आर्थिक विकासाचा डेटा जाहीर करण्यात आला. यामध्ये दुसऱ्या तिमाहीत चीनच्या आर्थिक विकास वाढीचा दर 1.2 टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनवर आता मंदीचे सावट दिसू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर, आर्थिक विकासाचा 5.5 टक्के दर गाठला जाईल अशी सरकारला आशा आहे.