Sri Lanka Crisis : वाढती महागाई, बेरोजगारी, आर्थिक संकटाच्या परिणामी श्रीलंकेत नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मागील 30 वर्षातील सर्वात भीषण आर्थिक संकटाला श्रीलंकेतील जनता सामोरी जात आहे. कधीकाळी तामिळींचा द्वेष आणि राष्ट्रवादाच्या मुद्यावर राजपक्षे सरकारचे कौतुक करणाऱ्या जनतेकडून सरकारविरोधात आंदोलन करत आहे. काही ठिकाणी हिंसाचाराचा आगडोंबही उसळला आहे. श्रीलंकेतील परिस्थिती स्फोटक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आपले सैन्य पाठवणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, भारताकडून श्रीलंकेला लष्करी मदत देण्यात आली नसल्याचे श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसांपासून राजपक्षे कुटुंबाला भारत शरण देणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याशिवाय, श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी भारतीय लष्कर श्रीलंकेत दाखल होणार असल्याची चर्चा केली जात होती. मात्र,कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांनी ही सगळी चर्चा निराधार असल्याचे म्हटले आहे. भारतीय लष्कर श्रीलंकेत येणार असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावरून प्रसारीत करण्यात आले आहे. मात्र, हे वृत्त निराधार असून त्यात काही सत्य नाही. अशा प्रकारचे वृत्त हे भारताच्या अधिकृत भूमिकेच्या विरुद्ध असल्याचे भारतीय उच्चायुक्तांनी म्हटले आहे.
श्रीलंकेतील लोकशाही, विकास, समृद्धी आणि सार्वभौमत्व याचा भारत पाठिराखा असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याआधीच स्पष्ट केले आहे. त्याशिवाय, राजपक्षे कुटुंबीय भारतात शरण घेणार असल्याचे वृत्तही निराधार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
...तर, नागरिकांवर गोळ्या घाला; सैन्याला आदेश
श्रीलंकेत परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली असून या देशाचा यादवीकडे प्रवास सुरू आहे. श्रीलंकेमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता संरक्षण मंत्रालयाने लष्कराला गोळीबाराचा आदेश दिला आहे. जे नागरिक सरकारी मालमत्तेचं नुकसान करत असतील किंवा जे नागरिक हिंसाचारामध्ये भाग घेत असतील त्यांना थेट गोळ्या घाला असा आदेश श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला दिला आहे. श्रीलंकेतील हिंसाचार पाहता मंगळवारी सकाळीच कर्फ्यु लावण्यात आला आहे.
सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मोठ्या हिंसाचाराच्या घटना घडल्या. सोमवारी रात्री हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आंदोलकांनी आग लावल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत