कोलंबो: श्रीलंकेमध्ये परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली असून या देशाचा यादवीकडे प्रवास सुरू आहे. श्रीलंकेमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता संरक्षण मंत्रालयाने लष्कराला गोळीबाराचा आदेश दिला आहे. जे नागरिक सरकारी मालमत्तेचं नुकसान करत असतील किंवा जे नागरिक हिंसाचारामध्ये भाग घेत असतील त्यांना थेट गोळ्या घाला असा आदेश श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला दिला आहे. श्रीलंकेतील हिंसाचार पाहता मंगळवारी सकाळीच कर्फ्यु लावण्यात आला आहे. 


 




श्रीलंकेतील आर्थिक संकट अधिक गडद झालं आहे. सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मोठ्या हिंसाचाराच्या घटना घडल्या. सोमवारी रात्री हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आंदोलकांनी आग लावल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्यतिरिक्त काही मंत्र्यांची घरालाही आग लावल्याची आणि तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेतमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराचाही मृत्यू झाला. 


त्यानंतर श्रीलंकन सरकारने आता कडक पाऊले उचलायला सुरवात केली आहे. जे कोणी हिंसाचार करतील किंवा सरकारी मालमत्तेचं नुकसान करतील त्यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहेत.


श्रीलंकेतील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त जनतेकडून गेल्या अनेक आठवड्यांपासून निदर्शनं सुरू आहेत. तीच परिस्थिती आता हिंसाचारामध्ये बदलली आहे. श्रीलंकेतील सर्व शहरांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलीस आंदोलकांवर अश्रुधुराचा आणि बळाचा वापर करत आहेत. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं दिसत असून आंदोलकांची संख्याही वाढत चालली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: